सेलिना जेटलीने सांगितला शाळेतला धक्कादायक अनुभव, सहावीतला फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:14 PM2024-08-18T17:14:32+5:302024-08-18T17:15:34+5:30
जेव्हा शिक्षक म्हणाले 'मॉडर्न राहतेस, तुझीच चूक आहे...'
कोलकता येथील ३१ वर्षीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या केसमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेक जण यावरुन आपला राग व्यक्त करत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही पेटून उठले आहेत. दरम्यान अभिनेत्री सेलिना जेटली(Celina Jaitley) जी सध्या इंडस्ट्रीपासून दूर संसारात रमली आहे तिने लहानपणी आलेल्या धक्कादायक अनुभवांचा उलगडा केला. सेलिनाने केलेलं ट्वीट सध्या व्हायरल होतंय.
सेलिना जेटलीने काल एक ट्वीट केलं. यात तिने तिचा 6 वी मधला फोटो शेअर केला. यासोबत तिने लिहिले, 'नेहमी पीडितेलाच चुकीचं समजलं जातं. हा माझा सहावीतला फोटो आहे. तेव्हा जवळच्या कॉलेजमधले काही मुलं माझी वाट बघत माझ्या शाळेबाहेर उभे राहायचे. मी शाळेच्या रिक्षातून जाताना ते माझा पाठलाग करायचे आणि काहीही बोलायचे. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण काही दिवसांनी त्यांनी माझं लक्ष वेधून घेण्यासाठी माझ्या दिशेने चक्क दगड मारले. रस्त्यावरचा एकही माणूस त्यांना काहीच बोलला नाही. माझ्या शाळेतल्या मॅडम मला म्हणाल्या की तू खूप मॉडर्न राहतेस. लूज कपडे घालत नाहीस. दोन वेण्या बांधत नाहीस केसांना तेलही नसतं. त्यामुळे ही माझीच चूक आहे.
THE VICTIM IS ALWAYS AT FAULT : In this pic I was in 6th grade only when boys from a nearby university started to wait outside my school.They would follow the school rickshaw making catcalls all the way home everyday. I pretended not to notice them and few days later because of… pic.twitter.com/cIrJmiDbQt
— Celina Jaitly (@CelinaJaitly) August 17, 2024
त्याच वयात असताना एक शाळेसमोर उभ्या असलेल्या एका माणसाने माझ्याकडे बघून प्रायव्हेट पार्ट्स दाखवले होते. कितीतरी वर्ष मी स्वत:लाच दोष देत राहीले कारण मॅडमने सांगितलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात राहिल्या होत्या. ११वीत असताना काही मुलांनी माझ्या गाडीचे ब्रेक खराब केले. मी घाबरत मॅडमला सांगितलं तेव्हा त्याही असं म्हणाल्या की तू खूप फॉरवर्ड वागतेस, गाडीवर येतेस, जीन्स घालते, छोटे केस ठेवतेस म्हणून मुलांचा गैरसमज होतो. मला आजही आठवतं तेव्हा ब्रेक फेल असल्याने मी स्कुटीवरुन उडी मारली होती. मला खूप लागलं होतं आणि तरी ही माझीच चूक होती. माझी गाडी खराब झाली. मी शारिरीक आणि मानसिकरित्या खचले. तरी माझीच चूक असल्याचं मला सांगितलं गेलं.
माझे आजोबा जे निवृत्त सैन्य अधिकारी होते जे देशासाठी दोन युद्धात लढले त्यांना मला शाळेत ने आण करावी लागत होती. त्या आगाऊ मुलांनी माझ्या आजोबांवरही कमेंट पास केल्या. त्यांनी मुलांकडे रागाने एकदा पाहिलं आणि नंतर माझ्याकडे पाहून चालत राहिले. अशा लोकांसाठी आपण लढलो याची त्यांना खंत वाटत होती. आता उभं राहायची वेळ आली आहे. आपली चूक नाही म्हणत आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याची वेळ आली आहे."