थॅलेसेमिया देशापुढे आव्हान : जॅकी श्रॉफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:54 AM2018-04-04T11:54:02+5:302018-04-04T17:26:35+5:30
सतीश डोंगरे देशात किमान पाच कोटी व्यक्ती या ‘थॅलेसेमिया मायनर’ आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रु ग्णांची ...
देशात किमान पाच कोटी व्यक्ती या ‘थॅलेसेमिया मायनर’ आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रु ग्णांची देशामध्ये भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्माला येण्याचा धोका आहे. अशात थॅलेसेमियाने देशापुढे आव्हान उभे केले असून, प्रत्येकाने याविषयी शक्य होईल तेवढी जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केले. थॅलेसेमिया इंडियाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड झालेल्या जॅकी श्रॉफशी संवाद साधला असता, त्यांनी थॅलेसेमियाशी लढा कसा देता येईल, याविषयी सांगितले.
प्रश्न : थॅलेसेमियाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा नेहमीच आरोप केला जातो, तुमची प्रतिक्रिया काय असेल?
- रक्तातील दोषामुळे निर्माण होणाºया थॅलेसेमिया आजाराच्या सद्यस्थितीबाबत संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. आजघडीला देशात थॅलेसेमिया हळूहळू पसरत आहे. थॅलेसेमियाला रोखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा देशात सर्वत्र उपलब्ध आहे काय? हा जरी एक मोठा प्रश्न असला तरी, या आजाराविषयी लोकांमध्ये पुरेशी जनजागृती होत आहे काय? याचाही तेवढाच विचार होण्याची गरज आहे. देशातील दुर्गम भागात वास्तव्य करणाºया लोकांना या आजाराचे नावही माहिती नसेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे यंत्रणेबरोबरच तेवढ्याच प्रभावीपणे जनजागृती व्हायला हवी, असे मी समजतो. आज जरी मी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलो तरी, जनजागृती करणारा प्रत्येकजण ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे, असे मला वाटते. त्यामुळे आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होऊन जगजागृती करावी.
प्रश्न : थॅलेसेमियाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्ही काही योजना आखल्या आहेत काय?
- लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्याची माझी योजना आहे. कारण जोपर्यंत तरु ण लग्न करण्यापूर्वी अथवा पालक मूल होऊ देण्यापूर्वी ते थॅलेसेमियावाहक आहेत की नाहीत हे तपासून पाहत नाहीत तोपर्यंत या आजाराला लगाम लावता येणार नाही. थॅलेसेमिया हा अनुवांशिक व असाध्य आजार असून ज्यामध्ये रक्तनिर्मिती बाधित असते. या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांना त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून रक्तपुरवठा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाचे अंकुर फुलविण्यासाठी प्रत्येकानेच एक पाऊल पुढे टाकायला हवे. वास्तविक समाजात चांगले काम करणाºयांची संख्या कमी नाही, बरेचसे लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. कोणी हात स्वच्छ धुण्याविषयी सांगत आहे तर कोणी प्राणायामाचे महत्त्व पटवून देत आहे. अशात मी या विषयावर काम करीत आहे. माझ्यानंतर माझी मुले यावर काम करतील. थोडक्यात काय तर कोणीतरी पुढे येऊन याविषयी जनजागृती करायला हवी.
प्रश्न : मुलगी कृष्णाच्या जन्माअगोदर तुम्ही थॅलेसेमियाच्या चाचण्या करून घेतल्या होत्या, काय सांगाल?
- होय, माझ्या सासूने म्हणजेच पत्नी आयशाच्या आईने त्यावेळी आम्हाला वेळीच खबरदारीचा सल्ला दिल्याने आम्ही या चाचण्या केल्या होत्या. अन्यथा मुलगी कृष्णालाही या आजाराची लागण झाली असती. परंतु देवाच्या आशीर्वादाने सर्वकाही ठीक झाले. थोडक्यात काय तर घरातच आम्हाला थॅलेसेमियाचा सामना करावा लागल्याने, ही बाब इतरांच्या नशिबी येऊ नये म्हणूनच मी याविषयीची जनजागृती करीत आहे. सध्या मी याविषयीचे बीज रोवले आहे. पुढे त्याचा वृक्ष करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
प्रश्न : थॅलेसेमिया या आजाराशी संबंधित चित्रपटांची निर्मिती व्हावी, अशी तुमची इच्छा आहे काय?
- होय, निर्मात्यांनी या विषयावर खरोखरच विचार करायला हवा. तसे झाल्यास मी त्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असेल. चित्रपट हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे जनजागृती होऊ शकते. विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजत असलेला ‘खूजली’ हा चित्रपट काहीसा तसाच आहे. थॅलेसेमियावर आधारित अशाच धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती व्हावी ही माझी कायम इच्छा असेल.
प्रश्न : ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाविषयी काय सांगाल?
- मराठीनंतर गुजराथी भाषेत निर्मिती केल्या जात असलेल्या ‘व्हेंटिलेटर’मध्ये काम करण्याचा एक वेगळाच अनुभव सांगता येईल. वास्तविक मला प्रत्येक भाषेतील चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने माझा नेहमीच प्रयत्नही राहिला आहे. ‘व्हेंटिलेटर’च्या माध्यमातून मला गुजराथी भाषेत काम करण्याची संधी मिळत आहे. या चित्रपटाची कथा मनाला भिडणारी असल्याने या चित्रपटाशी माझे वेगळेच नाते निर्माण झाले आहे