हल्ल्यानंतर बदल; सैफची सुरक्षा रोनित रॉयच्या हाती, हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेत केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 06:48 IST2025-01-23T06:47:55+5:302025-01-23T06:48:13+5:30
Saif Ali Khan News: जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता अभिनेता रोनित रॉयच्या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे.

हल्ल्यानंतर बदल; सैफची सुरक्षा रोनित रॉयच्या हाती, हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेत केला बदल
मुंबई - जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता अभिनेता रोनित रॉयच्या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. रुग्णालयातून घरी परतलेल्या सैफ आणि त्याच्या टीमने तातडीचे यासंदर्भातील बदल केले आहेत.
विविध टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रोनित रॉयने २५ वर्षांपूर्वी ‘एस सिक्युरिटीज अँड प्रोटेक्शन’ या सेलिब्रिटींना सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या एजन्सीची स्थापना केली होती. रोनितच्या एजन्सीने आतापर्यंत अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरूख, आमीर, सलमान ही खानत्रयी आणि मिथुन चक्रवर्ती आदी सेलिब्रिटींची सुरक्षाव्यवस्था पाहिली आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर उपचार घेऊन रुग्णालयातून सैफ परतला तेव्हा त्याच्याबरोबर रोनितही होता. त्याने सैफ राहत असलेल्या फॉर्च्युन हाइट्स या परिसराची पाहणी केली तसेच सुरक्षारक्षकांसोबत चर्चाही केली.
रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाला बक्षीस
जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात घेऊन जाणारा रिक्षाचालक भजनसिंह याची सैफ अली खानने भेट घेतली.
त्याने केलेल्या मदतीबद्दल सैफने भजनसिंहचे आभार मानले आणि त्याला काही रक्कम बक्षीस म्हणून दिली. तसेच भविष्यात काही मदत लागली तर त्यासाठीही तयारी दर्शवली.
रुग्णालयातून घरी जाण्यापूर्वी सैफने भजनसिंहची भेट घेतली. त्यावेळी सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर याही उपस्थित होत्या.