कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:18 IST2025-02-22T12:15:01+5:302025-02-22T12:18:24+5:30
"माझं दुर्दैव ..." विकी कौशलच्या 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, पण...

कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..."
Vineet Kumar Singh : सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची तुफान चर्चा आहे. हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. '१४ फेब्रुवारी २०२५ रोजी छावा' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'छावा' मध्ये विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शिवाय रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचं खूप कौतुक होत आहे. त्याचबरोबर छावा मध्ये कवी कलश हे पात्र साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंहची (Vineet Kumar Singh) सुद्धा या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जवळचे मित्र होते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची निर्घृण हत्या केली होती.चित्रपटातील विनितने केलेलं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. परंतु याआधी विनीतला लक्ष्मण उतेकरांच्या 'लुका छुपी' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ती नाकारली. याचा खुलासा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विनीत कुमार सिंहने एक किस्सा शेअर केला. त्यादरम्यान अभिनेत्याने 'छावा' चित्रपटाच्या आधी लक्ष्मण उतेकरांनी आपल्याला 'लुका छुपी' चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी ऑफर दिली होती. पण, काही गैरसमज झाल्यामुळे आपण ती नाकारल्याचं अभिनेत्याने स्पष्ट केलं. त्यानंतर 'लुका छुपी'साठी कार्तिक आर्यनला अप्रोच करण्यात आलं, असं त्याने सांगितलं. दरम्यान, याबद्दल सांगताना विनीत सिंह म्हणाला, "लक्ष्मण उतेकर यांच्या 'लुका छुपी' या सिनेमाची पटकथा माझ्या मित्राने लिहिली होती. जेव्हा त्या मित्राने मला सिनेमाची स्क्रिप्ट दाखवली तेव्हा मला वाटलं की, त्याला माझ्याकडून फीडबॅक हवा आहे."
पुढे अभिनेत्याने सांगितलं, "मी या स्क्रिप्ट बद्दल त्यांना थोडं उशीरा कळवलं आणि त्यामुळे निर्मात्यांना असं वाटलं की मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास कोणताही रस नाही. नंतर लक्ष्मण उतेकर यांच्याशी बोलताना जाणवलं की, ही भूमिका मलाच ऑफर करण्यात आली होती. या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मी तेव्हा फक्त फीडबॅक द्यायचा आहे, असं मला वाटलं होतं. हे माझं दुर्दैव होतं."
कार्तिक आर्यनपूर्वी 'लुका छुपी' साठी केलं होतं अप्रोच
"सुरुवातीला या चित्रपटाचं नाव 'मथुरा लाइव्ह्स' होतं. पण नंतर त्याचं नाव बदलून 'लुका छुपी' हे नाव देण्यात आलं. या चित्रपटात मला कार्तिक आर्यनची भूमिका ऑफर करण्यात आली होती." असा खुलासा अभिनेत्याने केला.
कार्तिक आर्यन आणि किर्ती सनॉन यांच्या 'लुका छुपी' या हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आला. लग्नाआधी लिव्हइन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची कथा यात सांगितली आहे.