"लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्..."; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?
By देवेंद्र जाधव | Updated: February 20, 2025 16:55 IST2025-02-20T16:54:14+5:302025-02-20T16:55:08+5:30
'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेता जेव्हा थिएटरमध्ये गेला तेव्हा काय घडलं याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय (chhaava, vicky kaushal)

"लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्..."; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?
'छावा' सिनेमा (chhaava movie) चांगलाच गाजतोय. सिनेमाने २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केलाय. 'छावा' सिनेमात कवी कलश यांची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगचं (vineet kumar singh) खूप कौतुक होतं. विनीत कुमार सिंग 'छावा'निमित्त थिएटरमध्ये जाऊन लोकांना भेटतोय. लोक विनीतला भेटून त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत. त्याच्याजवळ भावुक भावना व्यक्त करत आहेत. याविषयी विनीतने एक व्हिडीओ शेअर केलाय. याशिवाय त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विनीत कुमार सिंग लिहितो की, "काही क्षण तुमच्या आयुष्याशी कायम जोडले जातात. छावा सिनेमाचा संपूर्ण प्रवास याच क्षणांपैकी एक आहे. कोणालाही न कळू न देता थिएटरमध्ये जाणं ही खूप स्पेशल भावना असते. लोकांच्या डोळ्यात पाणी, माझ्या हातात त्यांचा हात, हा सिनेमा त्यांना किती भिडलाय, या भावना त्या माझ्याशी शेअर करत होते. छावा सिनेमांच्या अनेकांच्या हृदयाला स्पर्श करतोय हे मी कधीही विसरणार नाही."
"कवी कलश यांचं आयुष्य साकारणं ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट आहे. परंतु या भूमिकेला लोकांचं जे प्रेम मिळतंय त्याची मी कल्पनाच केली नव्हती. लोक जेव्हा भरभरुन या भूमिकेचं कौतुक करतात तेव्हा आपण केलेल्या प्रयत्नांना काहीतरी अर्थ आला, असं वाटतं. जेव्हा प्रेक्षक मला सिनेमातील काही संवाद म्हणायला सांगतात तेव्हा मी त्यांच्या इच्छेचा मान राखून ते संवाद म्हणतो. त्याक्षणी थिएटर मला माझ्या घरासारखं प्रेम आणि भावनांनी भरलेलं वाटतं."
"२३ वर्षांच्या या माझ्या कारकीर्दीत असे क्षण अनुभवणं ही खूप छान गोष्ट आहे. छावाला प्रेक्षकांचं जे भरभरुन प्रेम मिळतंय त्यामुळे मी कृतज्ञ आणि सर्वांचा आभारी आहे. छावा सिनेमा खूप स्पेशल केल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार.यानिमित्ताने आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे, तुम्ही फक्त मलाच नाही तर माझ्या PR ला सुद्धा प्रेम देत आहात. तुम्ही सर्व तुमच्या सोशल मीडियावर कवी कलश यांच्याबद्दल ज्या पोस्ट करत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे."
"प्रत्येक पोस्ट, प्रत्येक टॅग आणि प्रत्येक हॅशटॅगच्या माध्यमातून तुमचा पाठिंबा मला मिळतोय. असं वाटतंय जसं काही मी कुंभमेळ्यात स्नान केलंय. माझे सोशल मीडियावर मीलियनच्या घरात फॉलोअर्स नाहीत, परंतु जे कोणी माझे फॉलोअर्स आहेत ते कवी कलशसारखे माझे मित्र आहेत. तुमच्याविषयी माझी हिच भावना आहे. अत्यंत कृतज्ञता. हर हर महादेव."