दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:36 IST2025-01-22T18:34:40+5:302025-01-22T18:36:46+5:30
रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? असा प्रश्न येतोय. त्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांचं मत मांडलंय (chhaava, rashmika mandanna)

दाक्षिणात्य रश्मिका मराठमोळ्या येसूबाईंच्या भूमिकेत कशी दिसणार? 'छावा'चे दिग्दर्शक म्हणाले...
रश्मिका मंदाना ही गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. रश्मिका आता आगामी 'छावा' सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारतेय. 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये (chhaava trailer) रश्मिकाचा सुंदर अभिनय बघायला मिळतोय. आज ट्रेलर लाँच इव्हेंटला सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आणि 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर उपस्थित होते. त्यावेळी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानाच्या (rashmika mandanna) निवडीवरुन जे प्रश्नचिन्ह उमटवलं जात होतं, त्यावर लक्ष्मण यांनी त्यांचं मत मांडलं.
लक्ष्मण उतेकर रश्मिकाबद्दल काय म्हणाले?
लक्ष्मण उतेकर रश्मिकाबद्दल म्हणाले की, "स्क्रिप्ट लिहायच्या आधीच मी विकी आणि रश्मिकाचं नाव फायनल केलं होतं. तसं मी दिनेश सरांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, रश्मिका? साऊथ इंडियन अभिनेत्री मराठी महाराणी म्हणून कशी दिसेल? तेव्हा मी म्हणालो, काहीही असलं तरी तिचे डोळेच इतके pure आहेत की बाकी कोणी महाराणी येसूबाई दिसू शकली नसती. रश्मिकाच्या डोळ्यात जी निरागसता आहे ती येसूबाईंच्या भूमिकेसाठी एकदम समर्पक आहे." असं उत्तर देऊन लक्ष्मण उतेकर यांनी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानाच्या निवडीबद्दल त्यांचं मत मांडलं.
महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. रश्मिका पहिल्यांदाच अशा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतेय. रश्मिका आणि विकीची 'छावा'मधली केमिस्ट्री ट्रेलरमध्ये चांगली दिसतेय. आता सिनेमा रिलीज झाल्यावर या दोघांचा अभिनय कसा असणार, हे पाहायला मिळेल. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला संपूर्ण भारतात रिलीज होतोय.