वरुण शर्मा सांगतोय कसौटी जिंदगी... ने अशाप्रकारे केली होती माझ्या लव्ह स्टोरीला मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:00 AM2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:02+5:30
कसौटी जिंदगी की या मालिकेने माझ्या प्रेमकथेत मला प्रचंड मदत केली असे फुकरे फेम वरुण शर्मा याचे म्हणणे आहे.
कसौटी जिंदगी की ही मालिका 2000 च्या दशकात चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेतील प्रेरणा-अनुरागच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या मालिकेतील श्वेता तिवारी आणि सिझान खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर रात्री 8.30 वाजता लागायची. अनेकजण या मालिकेचे एकही भाग चुकवायचे नाहीत. याच मालिकेने माझ्या प्रेमकथेत मला प्रचंड मदत केली असे फुकरे फेम वरुण शर्मा याचे म्हणणे आहे.
वरुण शर्माने फुकरे या चित्रपटात साकारलेल्या चुचा या भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या दोन्ही भागातील त्याच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तो नुकताच खानदानी शफाखाना या चित्रपटात झळकला होता. तो आता छिछोरे या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा काळ हा नव्वदीमधील आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने वरुणला त्याच्या भूतकाळातील आठवणींविषयी विचारण्यात आले. त्यावेळी त्याच्या प्रेमकथेत कसौटी जिंदगी की या मालिकेचा मोठा हात असल्याचे त्याने झुमला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले. त्याने सांगितले की, ही मालिका सुरू व्हायची, त्यावेळी माझे एक प्रेमप्रकरण सुरू होते. त्यावेळी मोबाईलचा जमाना नव्हता. लोकांच्या घरात लँडलाईन असायचे. माझ्या प्रेयसीची आई आणि माझी आई दोघेही कसौटी जिंदगी की ही मालिका न चुकता पाहायचे. त्यामुळे या मालिकेच्या दरम्यान येणाऱ्या जाहिरातींच्या वेळात मी माझ्या प्रेयसीसोबत फोनवर बोलायचो. आमच्या दोघांच्याही आई मालिका पाहाण्यात मग्न असल्यामुळे आम्हाला फोनवर बोलताना कोणी पकडणार नाही याची आम्हाला खात्री होती.
छिछोरे या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारीने केले असून या चित्रपटात त्याच्यासोबतच सुशांत सिंग रजपूत, श्रद्धा कपूर, ताहीर राज भसीन, नवीन पोलिशेट्टी, तुषार पांडे आणि सहर्ष कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात काही मित्रांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील हे मित्र वीस वर्षांचे असताना आणि त्यानंतर ते चाळीशीत असताना असे दोन काळ दाखवले जाणार आहेत.