मास्टर अलंकार आता दिसतो असा, अभिनय सोडल्यानंतर करतो हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:02+5:30
मास्टर अलंकारचे खरे नाव अलंकार जोशी असून तो गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.
मास्टर अलंकारने दीवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर अलंकारला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्या काळातील सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असलेला तो बालकलाकार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने सीता और गीता, शोले, धडकन, ड्रीमगर्ल अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मास्टर अलंकारचे खरे नाव अलंकार जोशी असून तो गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. तो सध्या अमेरिकेत राहात असून तिथे त्याचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी ही मास्टर अंलकारची बहीण असून अलंकार अनेकवेळा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात येतो. अलंकारला दोन मुली असून त्यांची नावे अनुजा आणि अनिशा अशी आहेत.
मास्टर अलंकार आता अभिनयक्षेत्रापासून दूर असला तरी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची मुलगी अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. एमएक्स प्लेअरवर लवकरच हॅलो मिनी ही सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीरिजमध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत अनुजा जोशीला पाहायला मिळणार असून अनुजाने न्यूयॉर्क युनिर्व्हसिटीमधून शिक्षण घेतले आहे. एबीसी युनिर्व्हर्सलमध्ये तिने इन्टर्न म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांच्या सॅटर्डे नाईट लाईव्ह या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिला तिला मीरा नायर, ज्युली टायमोर या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आता हॅलो मिनीमध्ये अनुजा मिनी म्हणजेच रिवा बॅनर्जी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत एकट्या राहाणाऱ्या मिनी या मुलीभोवती या मालिकेची कथा फिरत असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अनुजा तिच्या अभिनयक्षेत्रातील पदार्पणाबाबत प्रचंड उत्सुक आहे. ती सांगते, गोल्डी बेडल यासारख्या दिग्गजाच्या शो द्वारे मला डिजिटल क्षेत्रात पदार्पण करायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे. रिवा ही अतिशय मस्तीखोर असून तिला विविध प्रयोग करायला आवडतात. ती आपल्यासारखीच असल्याचे प्रत्येक मुलीला ही सीरीज पाहिल्यावर वाटेल. ही पंधरा भागांची सिरीज फारूक कबीर यांनी दिग्दर्शित केली आहे.