चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची घौडदौड सुरूच, आतापर्यंत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:14 PM2019-04-26T16:14:42+5:302019-04-26T16:17:16+5:30
चीनी बॉक्स ऑफिसवर अंधाधुन हा चित्रपट ‘पियानो प्लेअर’ नावाने रिलीज करण्यात आलाय. चीनमध्ये ५००० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
आयुष्यमान खुराणाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत बक्कळ कमाई केली आहे. अनेक विक्रम आपल्या नावावर करत आयुष्यमानच्या या चित्रपटाने चीनमधील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवले आहे. आयुष्यमान, राधिका आपटे आणि तब्बू स्टारर आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ चीनमध्ये बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आता एक ठरला आहे. यापूर्वी दंगल, सीक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान आणि हिंदी मीडियम या चित्रपटांनी चीनी बॉक्स ऑफिसवर अशीच बक्कळ कमाई केली होती.
अंधाधुन या चित्रपटाने भारतात सुमारे ७५ कोटींचा बिझनेस केला होता. पण चीनमध्ये या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून भारतात कमवलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा या चित्रपटाने कमावला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत चीनमध्ये 45.59 मिलियन डॉलर म्हणजेच 319 करोड रुपये कमावले आहेत. पण आता या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे असे म्हणावे लागेल. हा चित्रपट लवकरच 350 कोटींचा टप्पा पार करेल असे सगळ्यांना वाटत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 23 व्या दिवशी या चित्रपटाने केवळ एक करोड रुपये कमावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट 350 करोडपेक्षा जास्त कमाई करेल का असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
चीनी बॉक्स ऑफिसवर अंधाधुन हा चित्रपट ‘पियानो प्लेअर’ नावाने रिलीज करण्यात आलाय. चीनमध्ये ५००० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. चीनमध्ये केवळ १३ दिवसांत या चित्रपटाने २०८.१७ कोटींची कमाई केली होती. ‘अंधाधुन’ या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च केवळ ३२ कोटी रूपये झाला होता. या चित्रपटाने आता त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. जगभरात या चित्रपटाने खूप चांगला बिझनेस केला आहे. याबाबतीत रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ आणि अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ला देखील ‘अंधाधुन’ने मागे टाकले आहे.
आयुषमान खुराणाने या चित्रपटात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आयुषमान, राधिका आणि तब्बू या तिघांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.