कॅन्सर झाल्याची सोशल मीडियावर माहिती पसरताच चिरंजीवींनी केलं ट्वीट, म्हणाले, "चाचणी केल्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 01:34 PM2023-06-04T13:34:45+5:302023-06-04T14:04:44+5:30
नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो.
Chiranjeevi clarifies about Cancer Rumors : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांना कॅन्सर झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामुळे चाहते काळजीत पडले होते. यावर चिरंजीवी यांनी स्वत: मौन सोडलं आहे. त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
चिरंजीवी यांनी ट्वीट करत लिहिले, "काही दिवसांपूर्वी मी एका कॅन्सर सेंटरच्या उद्घाटनावेळी म्हणलो होतो की कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. यासोबतच नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. म्हणूनच मी कोलन स्कोप चाचणी केली होती. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. तर उद्घाटनावेळी मी एवढचं म्हणालो की, त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे."
त्यांनी पुढे लिहिलं, "पण माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला गेला. मला कॅन्सर झाला होता आणि मी त्यावर मात केली अशी चर्चा पसरली. या चर्चेमुळे लोक घाबरले आणि दुखावले गेले."
चिरंजीवी यांच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ते आगामी 'भोलाशंकर' सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि कीर्ती सुरेश देखील असणार आहेत. तसंच त्यांचा 'वॉल्टर वीरैय्या' सिनेमा रिलीज झाला होता.