यासाठी मागितली चंकी पांडेने त्याची मुलगी अनन्या पांडेची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 06:30 AM2019-05-14T06:30:00+5:302019-05-14T06:30:03+5:30
किचन चॅम्पियन या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना चंकी पांडे आणि नीलम कोठारी या बॉलिवूडमधील कलाकारांना पाहायला मिळणार असून ते दोघे किचन चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
चंकी पांडेच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी अनन्या पांडेने नुकतीच बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तिच्या स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून तिची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. अनन्या गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. पण त्याचसोबत तिचे वडील चंकी पांडे देखील मुलीच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
किचन चॅम्पियन या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना चंकी पांडे आणि नीलम कोठारी या बॉलिवूडमधील कलाकारांना पाहायला मिळणार असून ते दोघे किचन चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या भागाची थीम बॉलिवूड असल्याने या कार्यक्रमातील किड ज्यूरी झीनत अमान, हेलन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या वेशात दिसणार आहे.
चंकी पांडे आणि नीलम कोठारी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यावर ते किचन चॅम्पियन्समध्ये थिरकणार असून आपल्या जुन्या आठवणींना देखील उजाळा देणार आहेत. त्याचसोबत ते एकमेकांची टर देखील खेचणार आहेत. किचन चॅम्पियन्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बिजलानी करत असून या कार्यक्रमात अर्जुनने चंकीला त्याच्या मुलीच्या बॉलिवूडमधील पदार्पणाविषयी विचारले.
यावर चंकी थोडासा भावुक झाला आणि त्याने सांगितले की, अनन्या जे काही करत आहे, त्याचा मला अभिमान आहे. अनन्याला एलए मधील युनिव्हर्सिटीमधून पुढील शिक्षणासाठी बोलावण्यात आले होते आणि त्याचवेळी करण जोहरने तिला स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी विचारले. करणच्या चित्रपटात काम करण्याची संधी तिला सोडायची नसल्याने तिने एलएला न जाण्याचे ठरवले. स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा तिला अनुभव खूपच चांगला आहे. या चित्रपटाच्या सेटवर तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. मला नेहमीच वाटते की, मी अनन्यासाठी अजून काहीतरी करायला हवे होते. मी तिची स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही यासाठी मला तिची क्षमा मागायची आहे. मला माहीत आहे की, आता ती तिच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.