अनन्या-आदित्य रॉय कपूरच्या अफेअरवर चंकी पांडेने सोडलं मौन, म्हणाला, "ती २५ वर्षांची आहे...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:15 AM2024-04-23T09:15:36+5:302024-04-23T09:16:17+5:30
नुकतंच चंकी पांडेने अनन्या आणि आदित्यच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक ब्रँड्सची ती अँबेसिडररही आहे. अनन्या आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चाही जोर धरुन आहेत. नुकतंच चंकी पांडेने (Chunkey Panday) अनन्या आणि आदित्यच्या नात्यावर भाष्य केलं आहे. त्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांना मात्र खटकली आहे.
'लहरे'ला दिलेल्या एका मुलाखतीत चंकी पांडेला अनन्याच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "मला वाटतं हे ठीक आहे. ती २५ वर्षांची आहे, माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवत आहे. तिला जे करायचंय त्यासाठी ती स्वतंत्र आहे. २५ वर्षांच्या माझ्या मुलीला हे सांगायची माझी हिंमत कशी होईल की तिने काय करावं. मला त्यांच्या नात्याची काहीच अडचण नाही. मी हे हॉलिवूडमध्येही पाहिलं आहे. तुम्हाला हे स्वीकारावं लागतं."
तुमच्या मुली तुमच्याकडे काही सल्ला मागतात का? यावर तो म्हणाला, "माझ्या दोन्ही मुली प्रत्यक्षात त्यांच्या आईच्या जास्त जवळ आहेत. जेव्हा त्यांना कशाची गरज असते तेव्हा माझा त्यांना फोन असतोच पण त्या भावनाच्या जास्त जवळ असतात. भावना त्यांना वयानुसार समजून घेते यातही शंका नाही. जेव्हा त्यांना मदत लागते मी नेहमीच तिथे असतो. पण जेव्हा सिनेमांसंदर्भातील सल्ल्याची गोष्ट येते तेव्हा थोडे मतभेद होतात कारण मी थोडा ओल्ड स्कूल आहे."
तो पुढे म्हणाला, "जेव्हा अनन्याला तिचा पहिला सिनेमा मिळाला आणि तिने तो करण्याचं ठरवलं तेव्हा मला खूप अभिमान वाटला. तिला आधी भूमिका छोटी वाटली पण ती ऑडिशनला गेली आणि तिला सिनेमा मिळाला. ती न्यूयॉर्क आणि एलएच्या कॉलेजमध्ये शिकली आहे. माझ्यावर कुटुंबाचा दबाव होता. पण 6 महिने मी तिच्यासोबत राहिलो. ५०० डॉलर दिले. पण हा सिनेमा तिला तिच्या मेरिटवर मिळाला आहे त्यामुळे मला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो."
चंकी पांडेने अनन्या आणि आदित्यच्या अफेअरवर दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांना मात्र खटकली. 'सगळ्या गोष्टी पैशात कसे मोजू शकतात' असं म्हणत नेटकऱ्यांनी चंकीवर जोरदार टीका केली. अनन्याचा 'खो गए हम कहा' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.