गांजा सेवनप्रकरणी कॉमेडियन भारती सिंहची पतीसह भायखळा कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 06:20 AM2020-11-23T06:20:40+5:302020-11-23T06:20:49+5:30
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी तपास करत असलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती व हर्ष यांच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील फ्लॅट व वर्सोव्यातील कार्यालयात छापा टाकला
मुंबई : घरात गांजासह रंगेहाथ सापडलेल्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भारतीची रवानगी भायखळा महिला कारागृहात करण्यात आली. त्यांच्या तपासातून यामध्ये अडकलेली आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्या जामिन अर्जावर साेमवारी सुनावणी होईल.
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी तपास करत असलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती व हर्ष यांच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील फ्लॅट व वर्सोव्यातील कार्यालयात छापा टाकला. त्या ठिकाणी ८६ ग्रॅम गांजा मिळाल्याने दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गांजाचे सेवन करीत असल्याची कबुली दिल्याने दोघांना शनिवारी अटक केली होती. रविवारी सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एनसीबीने शनिवारी पश्चिम उपनगरातील खारदंडा परिसरात छापा टाकून एका २१ वर्षांच्या तस्कराला पकडले होते. त्याने दिलेल्या माहितीतून भारती व हर्ष यांची नावे समोर आली.