"मुख्य आरोपी होता तो अजूनही...", सोलापूरमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रणित मोरेची आणखी एक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:44 IST2025-02-09T08:43:05+5:302025-02-09T08:44:14+5:30
कॉमेडीयन प्रणित मोरेला सोलापूरमध्ये स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान १०-१२ लोकांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. अखेर प्रणितने या सर्व प्रकारावर मौन सोडलंय (pranit more)

"मुख्य आरोपी होता तो अजूनही...", सोलापूरमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रणित मोरेची आणखी एक मागणी
कॉमेडीयन प्रणित मोरेला (pranit more) काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये (solapur) त्याच्या स्टँड अप कॉमेडी शोदरम्यान बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर जोक केल्यामुळे मारहाण करण्यात आली. अखेर प्रणितने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकारावर मौन सोडलंय. प्रणित व्हिडीओ शेअर करुन म्हणतो की, "सर्वांना नमस्कार. सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद. ज्या लोकांनी माझ्या तब्येतीविषयी विचारलं, माझ्यासाठी प्रार्थना केली."
"अनेकांनी माझ्यावर जो हल्ला झाला त्याची स्टोरी शेअर केली.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. बातम्यांमध्ये याविषयी सांगण्यात आलं. यामुळे सोलापूर पोलिसांनी पाच लोकांना याप्रकरणी अटक केलीय. कोणाला अटक केली आहे, हे अजून सांगण्यात आलं नाहीये. जो मुख्य आरोपी होता तो अजूनही फरार आहे. ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामुळे पुढील वेळेस फ्रीडम ऑफ स्पीच किंवा जो कोणी व्यक्ती विनोद करतोय त्यावर लोकांनी हा विचार नाही केला पाहिजे की, आम्ही याला मारु शकतो."
"महत्वाची गोष्ट म्हणजे जे CCTV फूटेज आहे ते पोलिसांनी घेतलंय. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही प्रयत्न करतोय की ते फूटेज आम्हालाही मिळावं. त्यामुळे खरंच असं घडलं होतं का, कोणी हे कृत्य केलंय या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. कारण CCTV फूटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की कोण लोक होते. त्यामुळे त्या लोकांनी काय केलंय, हे सर्वांपर्यंत पोहचेल.माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही शेवटची पोस्ट जशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली होती तशीच ही सुद्धा पोस्ट शेअर करा. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई होईल आणि या प्रकरणात कोण लोक होते हे सर्वांपर्यंत येईल. जय हिंद जय महाराष्ट्र."