Confirm ! तर या सिनेमातून मानुषी छिल्लर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, तर या कलाकारांच्याही आहेत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 07:15 AM2019-11-15T07:15:00+5:302019-11-15T07:15:00+5:30
मानुषी प्रशिक्षित कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि तिने तिचे हे शिक्षण सुप्रसिद्ध नर्तक राजा आणि नर्तिका राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून घेतले आहे.
हरियाणाच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला . हा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय ठरली होती.मिस वर्ल्ड बनल्यानंतर ती बॉलीवुडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवसांपासून ती बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि मात्र या बातमीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यश राज फिल्सने त्यांच्या पृथ्वीराज या सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची नायिका म्हणून मानुषीची निवड निश्चित केली आहे.
निर्भीड आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज यांच्या जीवनावर आणि शौर्यावर हा चित्रपट आधारित असेल. तिच्या बरोबर पृथ्वीराज म्हणून सुपरस्टार अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे आणि राजा पृथ्वीराजाची प्रेयसी असणाऱ्या देखण्या संयोगिताच्या भूमिकेत मानुषी झळकणार आहे. पृथ्वीराज चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.
द्विवेदी म्हणाले, “या भूमिकेसाठी आम्हाला अतिशय सुंदर भारतीय नायिकेची गरज असल्याने आम्ही अनेक जणींच्या ऑडीशन्स घेतल्या. संयोगिता ही अतिशय सुंदर मुलगी तर होतीच; पण त्याचबरोबर ती आत्मविश्वासाने भरलेली ठाम व्यक्ती देखील होती. संयोगिताच्या या आकर्षक व्यक्तिमत्वाला साजेल अशा कोणाच्या तरी शोधात आम्ही असताना आम्हाला मानुषीत हे गुण आढळले. या निवडीबाबत आम्हाला पूर्ण खात्री करून घ्यायची असल्याने या भूमिकेसाठी तिला अनेक वेळा ऑडीशन्स द्याव्या लागल्या आणि प्रत्येक वेळी तिने आमची निवड योग्यच असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर ती आठवड्यातून सहा दिवस सराव करत असून गेल्या नऊ महिन्यात यशराजने तिला या भूमिकेसाठी अतिशय चांगल्या रितीने तयार केले आहे.
मानुषी म्हणाली, “यश राज फिल्म्ससारख्या प्रोडक्शन हाऊसकडून नायिका म्हणून निवडले जाणे हा एक मोठा सन्मानच आहे. मी खूप आनंदी आहे आणि या प्रवासात मला जे काही शिकायला मिळणार आहे त्यासाठी मी अतिशय आतुर देखील आहे. आत्तापर्यंतचे माझे आयुष्य हे खरोखरच एखाद्या परिकथेप्रमाणे गेले आहे. अगदी मिस् इंडिया होण्यापासून ते मिस् वर्ल्ड होण्यापर्यंत आणि आता सिनेसृष्टीतील पदार्पणातच इतकी मोठी संधी म्हणजे माझ्या आयुष्यातील नवा, रोमांचकारी अध्याय आहे. राजकन्या संयोगिताची भूमिका निभावणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. ते एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. ती नेहमीच न्यायाच्या बाजूने उभी राहीली आणि तिने तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेतले.
तिचे आयुष्य हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे आणि तिचे व्यक्तिमत्व जसेच्या तसे साकारण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.” पूर्वीच्या मिस् वर्ल्ड्स आणि अतिशय यशस्वी असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघी मानुषीच्या आवडत्या असून ती त्यांना आदर्श मानते. मानुषी प्रशिक्षित कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि तिने तिचे हे शिक्षण सुप्रसिद्ध नर्तक राजा आणि नर्तिका राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून घेतले आहे. 2020 च्या दिवाळीत पृथ्वीराज चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.