‘द ताश्कंद फाईल्स’चे प्रदर्शन रोखण्याची मागणी! भडकले विवेक अग्निहोत्री!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:04 PM2019-04-10T12:04:36+5:302019-04-10T12:13:03+5:30
विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटापाठोपाठ काँग्रेसने ‘द ताश्कंद फाईल्स’ या आणखी एका चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे.
विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटापाठोपाठ काँग्रेसने ‘द ताश्कंद फाईल्स’ या आणखी एका चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. याच आठवड्यात १२ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय. पण ऐन रिलीजच्या तोंडावर माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या कुटुंबीयांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात निर्मात्यांना नोटीस बजावले आहे. काँग्रेसनेही माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास शांतता भंग होण्याचा धोका आहे. शिवाय लोकसभा निवडणूक काळात चित्रपटामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शास्त्री कुटुंबाच्या कुण्याही व्यक्तिची परवानगी घेतली गेली नाही, असा दावाही यात करण्यात आला आहे.
दरम्यान ‘द ताश्कंद फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तथापि ही नोटीस शास्त्री कुटुंबीयांकडून पाठवण्यात आली असली तरी यामागे गांधी कुटुंब असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. काँग्रेसमधील काही बडे नेते प्रदर्शन रोखण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘आमचा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत असताना काल रात्री काँग्रेसचे प्रमुख सदस्य आणि माजी सचिवांकडून या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली गेली. ते लाल बहादुर शास्त्री यांचे नातू आहेत आणि गांधी कुटुंबाचे जवळचे सहकारी आहेत. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खोट्या असल्याचा त्यांचा दावा आहे. ७ एप्रिलला मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगसाठी शास्त्री कुटुंब उपस्थित होते. त्यांनी चित्रपट पाहिला आणि माझे कौतुक केले. मग अचानक ऐन रिलीजच्या तोंडावर चित्रपटावर आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. हा चित्रपट पूर्णपणे पत्रकरांना समर्पित आहे. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मी लढा देणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रशियाच्या दबावानंतर शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार या नावाने तो करार जाहीर झाला. ताश्कंद मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्या सोबत युद्ध समाप्त करार केल्यानंतर केवळ १२ तासांत ११ जानेवारी १९६६ रोजी लाल बहादुर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा शास्त्रींच्या या गूढ मृत्यूवर आधारित आहे.