कोरोना मुक्त झालेल्या या अभिनेत्रीने प्लाझ्मा थेरपीसाठी केले रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:32 PM2020-05-11T17:32:53+5:302020-05-11T17:33:28+5:30
रक्तदान केल्यानंतर या अभिनेत्रीला 500 रुपये आणि सर्टिफिकेट दिल्याचे तिने सांगितले आहे.
बॉलिवूडचे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी व अभिनेत्री झोया मोरानी कोरोना मुक्त झाली असून काही दिवसांपूर्वी तिने कोरोनाशी सामना करणाऱ्या व्यक्तींच्या प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे रक्तदान केल्याचे सांगितले आहे.
कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे. त्यामुळे झोयाने रक्त दान करण्याचा निर्णय घेतला होता. झोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने नायर रुग्णालयात रक्तदान करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रक्तदान करत आहे आणि तिच्या आजूबाजूला डॉक्टर असल्याचे पहायला मिळत आहे. रक्तदान केल्यानंतर तिला प्रमाणपत्र आणि ५०० रुपये देण्यात आल्याचे ती आनंदी असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी झोयाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत रक्तदान करण्याबाबत सांगितले होते. ती म्हणाली होती की, कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला व्यक्ती पुढच्या १४ दिवसांपर्यंत रक्तदान करु शकतो. या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढणारे अॅण्टिबॉडीज तयार होतात. यांचा वापर इतर लोकांना बरे करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता तिने प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले असून तिच्या या कृतीचे सगळीकडून कौतूक होत आहे.