Corona Virus : कनिका कपूरमुळे वाढली आजुबाजूच्या लोकांची चिंता, जाणून घ्या काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 11:04 AM2020-04-12T11:04:03+5:302020-04-12T11:05:13+5:30
बिल्डींगमधील लोकांसाठी कनिका चिंतेचे कारण ठरली आहे.
बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. मात्र 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठीक झाली आणि तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. अर्थात कनिकाला 14 दिवस तिच्याच घरात क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. पण याऊपरही ती राहत असलेल्या भागातील लोक प्रचंड दहशतीत आहेत. विशेषत: ती राहत असलेल्या बिल्डींगमधील लोकांसाठी कनिका चिंतेचे कारण ठरली आहे.
होय, कनिका ज्या बिल्डींगमध्ये राहतेय, ती बिल्डींग अद्याप सील करण्यात आलेली नाही. तिच्या बिल्डींगमधील लोकांच्या मते, पॉझिटीव्ह केस आढळल्यानंतर बिल्डींग सील करायला हवी. कारण ज्याठिकाणी पॉझिटीव्ह केस आढळली तो तो सर्व भाग सील केला गेला आहे. असे असताना कनिका पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतरही बिल्डींग सील का केली गेली नाही, असा येथील रहिवाशांचा सवाल आहे. यावर कनिका आता पूर्णपणे ठीक असून तिच्यामुळे कुणालाही धोका नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पण तरीही कनिका राहत असलेल्या बिल्डींगमधील लोक दहशतीत आहेत. प्रशासनाच्या उत्तराने त्यांचे समाधान झालेले नाही.
गेल्या 4 एप्रिलला कनिकाची पाचवी चाचणी करण्यात आली होती. यात तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तिचा सहावा रिपोर्टही निगेटीव्ह आला होता. यानंतर रूग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली होती.
बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी होती.
उडाली होती खळबळ
कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती. लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वर्तुळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते. या यानंतर कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. कनिकाने ती कोरोपा पॉझिटीव्ह असल्याची माहिती लपवून अनेकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोपही झाला होता. इतकेच नाही कनिका लंडनवरून परतली त्यावेळी तपासणीपासून वाचण्यासाठी एअरपोर्टच्या बाथरूममध्ये लपल्याचा आरोपही केला होता. अर्थात हे आरोप कनिकाने खोडून काढले होते. याऊपरही कनिकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.