Corona Virus : कनिका कपूर ठणठणीत, 18 दिवसांनंतर रूग्णालयातून मिळाली सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:45 AM2020-04-06T10:45:03+5:302020-04-06T11:33:49+5:30
सहावा रिपोर्टही निगेटीव्ह
बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठीक झाली असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 4 एप्रिलला कनिकाची पाचवी चाचणी करण्यात आली. यात तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर तिचा सहावा रिपोर्टही निगेटीव्ह आला. यानंतर रूग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली.
Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls
— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020
उडाली होती खळबळ
बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी होती.
कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती. लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते. या यानंतर कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. कनिकाने ती कोरोपा पॉझिटीव्ह असल्याची माहिती लपवून अनेकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोपही झाला होता. इतकेच नाही कनिका लंडनवरून परतली त्यावेळी तपासणीपासून वाचण्यासाठी एअरपोर्टच्या बाथरूममध्ये लपल्याचा आरोपही केला होता. अर्थात हे आरोप कनिकाने खोडून काढले होते. याऊपरही कनिकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
कुटुंबीय आनंदी
कनिकावर लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरु होते. 20 मार्चला तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. तिच्या सलग चार कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्या होत्या. यामुळे तिच्या कुटुंबीयाच्या चिंता वाढल्या होत्या. रूग्णालयात सुरु असलेल्या उपचारावर कनिकाच्या कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त केले होते. पण अखेर कनिकाची पाचवी टेस्ट निगेटीव्ह आली आणि कनिकाला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.