CoronaVirus : एक थँक्यू तो बनता है यार...! अक्षय कुमारने पुन्हा पुढे केला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:20 AM2020-04-10T11:20:51+5:302020-04-10T11:21:52+5:30
दानशूर अक्षय...!!
संपूर्ण देश कोरोना व्हायरसमुळे दहशतीत आहे़ दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. सरकार कोरोना संकटाशी निपटण्यासाठी यशाथक्ती प्रयत्न करत आहे. कोरोनाविरूद्ध सुरु असलेल्या लढाईत देशातील अनेक दानशूर पुढे येऊन सरकारला मदत करताना दिसत आहेत. बॉलिवूडच्याही अनेक सेलिब्रिटींनी सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सर्वात आघाडीवर आहे. अलीकडे अक्षयने पीएम केअर फंडात 25 कोटी रूपय दान दिलेत. आता दानशूर अक्षयने बीएमसीला 3 कोटी रूपयांची मदत दिली आहे. अक्षयने हे 3 कोटी रूपये मास्क शिवाय टेस्टिंग किट्स खरेदीसाठी दिल्याचे कळतेय.
बीएमसीचे आशुतोष सलिल यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने बीएमसी कमिशनरसोबत संपर्क साधला. यानंतर त्याने ही मदत केली. आम्ही त्याचे आभारी आहोत. अक्षयने दान केलेला हा निधी पीपीई, मास्क, रॅपिड टेस्टिंग किटच्या उत्पादनांसाठी केला जाईल, असे सलिल यांनी सांगितले.
व्हिडीओ शेअर करत मानले आभार
अक्षय कुमारने केवळ मदतीचा हात पुढे केला नाही तर कोरोनाशी लढणा-या सर्वांचे मनापासून आभारही मानलेत. यार एक थँक्यू तो बनता है...असे तो या व्हिडीओत तो म्हणतोय. ‘काल मी एका माझ्या पोलिस मित्राशी बोललो. तो जे काही बोलला, त्याने मला विचार करायला भाग पाडले. तुम्ही सगळे घरात आहात आणि आम्ही घरात जायला घाबरतोय, असे तो पोलिस मित्र मला म्हणाला. त्याचे ते वाक्य ऐकून मी विचारात पडलो. खरच कोरोना संकटाच्या काळात आपण सगळे घरात आहोत. टीव्ही पाहतोय, वेगवेगळ्या पक्वानांवर ताव मारतोय. पण पोलिस, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी हे अहोरात्र या संकटाशी लढत रस्त्यांवर फिरताहेत. ते सुद्धा स्वत:चा जीव धोक्यात घालून. या सगळ्यांचे आभार तर मानावेच लागतील. एक थँक्यू तो बनता है यार. मी आणि माझे कुटुंब मनापासून या सर्वांचे आभार मानतो, ’ असे अक्षय व्हिडीओत म्हणतोय.