Lockdown : अब कहें तो कहें क्या...! अनुराग कश्यपचा मोदींना जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:59 AM2020-03-25T09:59:16+5:302020-03-25T09:59:58+5:30
मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काहीच वेळात दिग्दर्शक अनुराग कश्यपचे ट्विट आले आणि हे ट्विट क्षणात व्हायरल झाले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री 8 च्या ठोक्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात, याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. सगळ्यांच्या नजरा टीव्हीवर टिकल्या होत्या. अखेर मोदींनी देशाला संबोधित केले आणि पुढील 21 दिवस देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर काहीच वेळात दिग्दर्शक अनुराग कश्यपचे ट्विट आले आणि हे ट्विट क्षणात व्हायरल झाले.
होय, अनुराग कश्यपने मोदींनीच्या घोषणेवर नाही तर ही घोषणा करण्यासाठी मोदींनी निवडलेल्या वेळेवरून जोरदार टोला हाणला.
8 बजे रात के बजाए सुबह आठ बजे बोल देते । चार बजे भी बोल देते तो इंतज़ाम कर लेते । हमेशा आठ बजे ही बोलते हैं और समय देते हैं चार घंटे का । उनका क्या जो पैदल घर को निकले हैं शहर छोड़ के , क्योंकि बस या ट्रेन नहीं चल रही ? अब कहें तो कहें क्या । ठीक है प्रभु।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) March 24, 2020
‘रात्री 8 वाजताऐवजी सकाळी 8 वाजता बोलले असते. 4 वाजता बोलले असते तरी व्यवस्था केली असते. नेहमी रात्री 8 वाजता बोलता आणि तयारीसाठी वेळ देता तो चार तासांचा. बस बंद आहेत, ट्रेन बंद आहेत, अशात जे चालत घरी जातात त्यांचे काय? आता काय बोलणार? ठीक है प्रभु,’ असे ट्विट अनुराग कश्यपने केले.
मोदींवर टीका करण्याची अनुरागची पहिली वेळ नाही. याआधीही अनेक मुद्यांवर अनुरागने मोदींना लक्ष्य केले आहे. सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मोदींवर टीका करताना अनुरागने त्यांना मुका व बहिरा म्हटले होते. ‘आमचे मुख्य सेवक, आमचे पंतप्रधान, जनतेचे मुख्य सेवक बहिरे व मुके आहेत आणि भावभावनांच्या पलिकडे आहेत. ते फक्त नाटकी भाषण देऊ शकतात. बाकी सगळे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांना ना काही दिसत, ना काही ऐकू येत़,’ अशा शब्दांत अनुराग कश्यपने मोदींवर निशाणा साधला होता.