CoronaVirus: खऱ्या हिरोंची ओळख करून दिली आयुषमान खुराणाने, म्हणतोय - नंतरही द्या त्यांना आदर व सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:34 PM2020-04-10T20:34:43+5:302020-04-10T20:36:02+5:30
आयुषमान खुराणाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल या लोकांचा आदर
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील घरात लॉकडाउन आहेत. मात्र कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तर कुणी क्वारंटाईन व कोरोनाग्रस्तांसाठी आपली हॉटेल व ऑफिस दिले आहेत. याशिवाय हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. अभिनेता आयुषमान खुराणाने नुकताच त्याच्या घरासमोरील एका कोरोनाग्रस्ताचे उदाहरण देत जे आपल्यासाठी घराबाहेर काम करत आहेत त्यांना लॉकडाउननंतर त्यांचा आदर करा असा मेसेज दिला आहे.
आयुषमान खुराणाने एका व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना सांगितले की, आपल्याला फक्त घरातच थांबायचं आहे. ती समोरची इमारत काही दिवसांपूर्वी सील करण्यात आली. त्यामुळे आता आजूबाजूच्या लोकांचे जीवन थोडेसे बदलले आहे. त्यात इमारतीच्या खाली असणाऱ्या दुकानातून घरचा किरणा येत होता. त्याने आजाराबद्दल आधीच सांगितले असते तर काय झाले असते. आज आम्ही घाबरलेलो आहोत. जीवित आहोत पण मेल्यासारखे आहोत. आज वाटतं की जर सर्व काही ठीक करता आले असते तर जगाला रिवाइंड केले असते. पण विश्वास ठेवा हे सगळ्यांमुळे ओढवलेली परिस्थिती आहे.
पुढे आयुषमान म्हणाला की, सलाम आहे ज्यांना जे रस्ते साफ करत आहेत, कचरा घेऊन जात आहेत. घरचे सामान घेऊन येत आहेत आणि परत आपल्या घरी जात आहेत.पण आपण त्यांना कधीच आदर दिला नाही. आपण पैसेवाले आहोत ना. आपल्या बापाचं काय जातं. पण कोरोना व्हायरस त्यांच्या कुटुंबाला होऊ नये म्हणून ते बिचारे घाबरतात. ते त्यांच्या छोट्या मुलांना स्पर्शदेखील करू शकत नाही. हे श्रीमंत गरीबांच्या माणूसकीच्या पलिकडचे नाते आहे. या देशाला गरीबच चालवतो आणि गरीबच चालवणार. आपल्याला यावेळी सर्व सुविधा गरीबच देणार.
आता जेव्हा सगळं काही सुरळीत होईल तेव्हा या लोकांना आदर व सन्मान द्या. कोणतेही काम छोटे नसते हे आधी तुमच्या डोक्यात घालून घ्या. आज डॉक्टर, नर्स, पोलीस, आपले सुरक्षारक्षक हे आहेत सर्वात जास्त कामाचे. आम्ही सगळे बॉलिवूडचे हिरो आहोत फक्त नावाचे. आम्ही फक्त पैसे देऊ शकतो. शस्त्र देऊ शकतो. त्यांनाच सगळे सहन करायचे आहे. आम्हाला तर फक्त घरातच रहायचे आहे, असे आयुषमानने सांगितले.