गरीबांना मदत करण्यासाठी विकी कौशल अशाप्रकारे जमा करतोय पैसा, तुम्ही देखील म्हणाल तुस्सी ग्रेट हो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:38 PM2020-05-14T15:38:00+5:302020-05-14T15:40:01+5:30
विकी कौशलने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सरकारला एक कोटी रुपयांची मदत केली होती आणि आता गरीबांना मदत करण्यासाठी पैसा जमा करत आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.
विकी कौशलने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सरकारला एक कोटी रुपयांची मदत केली होती. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले होते की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. या अतिशय वाईट काळात मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे. आपण सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करूया...
एक करोड रुपये इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर आता विकीने मजदूर आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ टाकला असून त्याच्या फॅन्सना त्याच्यासोबत ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे. याद्वारे विकी मजदूर आणि गरीब लोकांना मदत करणार आहे. विकी मिळालेला सगळा पैसा अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या फॅनकाईंड या संस्थेला देणार आहे.
इन्स्टाग्रामच्या व्हिडिओद्वारे तो सांगत आहे की, मी तुमच्यासोबत एक व्हर्च्युअल गेम खेळणार आहे. यासाठी तुम्हाला Fankind.org/Vicky वर लॉग इन करून मजदूर आणि गरीब लोकांसाठी आर्थिक मदत करावी लागणार आहे. या पैशांचा वापर मजदूर आणि गरीबांना धान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तू देण्यासाठी करण्यात येणार आहे.
विकी या व्हिडिओत पुढे सांगत आहे की, आर्थिक मदत करणाऱ्या तीन लोकांसोबत मी व्हर्च्युअल गेम खेळणार आहे. तुमच्या छोट्याशा मदतीने देखील काही लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊ शकतो.
विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तू खूप चांगले काम करत आहेस असे विकीला अनेकजण कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.