अभिनेता धनुषच्या ‘जन्मदात्यांचा’ घोळ सुटेना...! मद्रास हाय कोर्टानं बजावलं समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:18 PM2022-05-03T16:18:07+5:302022-05-03T16:21:32+5:30
Dhanush : काही महिन्यांपूर्वी धनुष पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत होता. आता तो एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.
धनुष ( Dhanush ) हा साऊथचा नावाजलेला आणि प्रसिद्ध चेहरा. बॉलिवूडमध्येही तो चांगलाच लोकप्रिय आहे. अन्य हिरोंसारखं पिळदार शरीर, सिक्स पॅक्स, गोरा रंग नसला तरी, त्याची स्टाईल अफलातून आहे आणि यामुळेच त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या कोलावरी डी गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी धनुष पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत होता. आता तो एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. मद्रास हायकोर्टाने त्याला समन्स जारी केला आहे. प्रकरण धनुषच्या जन्मदात्यांच्या घोळाशी निगडीत आहे. (Madras High Court Summons Actor Dhanush)
धनुष हा आमचा मुलगा आहे, असा 60 वर्षीय आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी यांचा दावा आहे आणि हे प्रकरण गेल्या पाच वर्षांपासून कोर्टात सुरू आहे. याचप्रकरणी आता त्याला समन्स बजावण्यात आला आहे.
हे प्रकरण खूप जुनं आहे. 2017 मध्ये धनुषने ही केस जिंकली होती. पण आता पुन्हा एकदा दाम्पत्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली असून पोलिस चौकशीची मागणी केली आहे.
काय आहे घोळ
आर. काथीरेसन व के. मीनाक्षी हे दाम्पत्य चेन्नईपासून 480 किमी दूर मनमपत्ती गावात राहतं. धनुष हा आमचा मुलगा आहे, असा त्यांचा दावा आहे. धनुषच्या जन्माचा दाखला आणि त्याचे लहानणीचे फोटो सादर करत त्यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे. धनुष आमचा मुलगा आहे आणि या नात्याने त्याने आम्हाला दर महिन्याला 65 हजार रूपये इतका देखभाल खर्च द्यावा, आमची काळजी घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. धनुषचा जन्म मदुराईमधील राजाजी हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव कलाईसेल्वन आहे. 2002 साली जिल्ह्याच्या शाळेत शिकत असताना तो पळून गेला होता. नंतर प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक कस्तुरी राजा यांनी त्याचा ताबा घेतल्यावर त्याने स्वत:च नाव बदलून धनुष के. राजा ठेवलं,असा या दाम्पत्याचा दावा आहे. धनुषच्या खांद्यावर एक तीळ आहे आणि त्याच्या हातावर एक जखमेची खूप आहे, असंही या दाम्पत्याचं म्हणणं आहे. धनुषने आधीच या दाव्यांचा इन्कार केला आहे.