मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Jacqueline Fernandezला कोर्टाचा झटका, विदेशात जाण्याची परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:24 IST2022-12-22T18:23:25+5:302022-12-22T18:24:05+5:30
Jacqueline Fernandez : जॅकलिनला २३ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत बहरीनला जायचे होते. तिने परदेशात जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र पटियाला कोर्ट हाऊसने तिला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Jacqueline Fernandezला कोर्टाचा झटका, विदेशात जाण्याची परवानगी नाकारली
महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)च्या अडचणीत वाढ झाली आहे. तिने परदेशात जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र पटियाला कोर्ट हाऊसने तिला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तिने तिच्या आजारी आईला भेटण्यासाठी बहरीनला जाण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर जॅकलिनने कोर्टातून आपली याचिका मागे घेतली आहे. जॅकलिनला २३ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत बहरीनला जायचे होते.
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पटियाला हाऊस कोर्टाने विचारले, 'तुम्ही बहरीनचा व्हिसा घेतला आहे का?' याच्या उत्तरात जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, 'व्हिसा आधीच होता.' तेव्हा ईडीने सांगितले, 'हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. एका निर्णायक वळणावर आहे आणि हे परदेशी नागरिक आहेत.' यानंतर कोर्टाने जॅकलिनला सांगितलं, 'तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मग या परिस्थितीत जाण्याची काय गरज आहे. आम्ही समजतो की ही तुमच्यासाठी भावनिक बाब आहे. तुला तुझ्या आजारी आईला भेटायचं आहे.
जॅकलिनच्या परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला ईडीने विरोध केला आहे. जॅकलिन परदेशातही तिचे करियर घडवू शकते, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. कोर्टाने जॅकलिनच्या वकिलाला विचारले की ती आपली याचिका मागे घेत आहे का? यानंतर जॅकलिनच्या वकिलाने जॅकलिनशी बोलण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाला जॅकलिनला याचिका मागे घेण्यास सांगण्यास सांगितले. काही वेळाने पुन्हा सुनावणी सुरू झाल्यावर जॅकलिनने कोर्टातून आपली याचिका मागे घेतली.
न्यायालयाने १५ नोव्हेंबर रोजी जॅकलिनला नियमित जामीन मंजूर केला होता, तिला अद्याप या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही. तपासासंदर्भात ईडीने अभिनेत्रीला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. पुरवणी आरोपपत्रात तिला प्रथमच आरोपी करण्यात आले.