'डिस्को डान्सर'च्या निर्मात्यांनी पत्नीच्या उपचारासाठी मागितली मदत, सापडले आर्थिक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:04 PM2021-11-16T19:04:22+5:302021-11-16T19:04:44+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष मोठ्या अडचणीत सापडले आहेत. बी. सुभाष यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात 'डिस्को डान्सर', 'आंधी तुफान', 'अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' आणि 'कसम पांडे वाली की' या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र आता त्यांची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडे पत्नीवर उपचार करण्यासाठीदेखील पैसे नाहीत.
बी सुभाष यांच्या ६७ वर्षीय पत्नी तिलोत्तिमा मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात मृत्यूशी सामना करत आहे. तिलोतीमाला यांना फुफ्फुसांशी संबंधित आजार आहे. त्यासाठी खूप पैसे खर्च केले जात आहे. आता बी सुभाष आणि त्यांच्या कुटुंबियांना या आजारावर उपचार करणे खूप कठीण जात आहे. पत्नीच्या उपचारासाठी ३० लाखांची गरज आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता हिने लोकांना केटो नावाच्या निधी उभारणी संस्थेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
बी सुभाष यांची पत्नी गेल्या ५ वर्षांपासून आहे डायलिसिसवर
बी सुभाष यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची पत्नी गेल्या ५ वर्षांपासून डायलिसिसवर आहे. नुकतेच त्यांच्या पत्नीची तब्येत खालावली. यावेळी कोणत्याही असोसिएशनची मदत घेण्याच्या प्रश्नावर बी सुभाष म्हणाले, 'मला वाटत नाही की, यावेळी कोणत्याही असोसिएशनशी संपर्क साधणे व्यावहारिक असेल. जास्तीत जास्त ते आम्हाला काही पैसे देतील. यासाठी माझ्या मुलीने ऑनलाइन योगदानासाठी अर्ज केला आहे.
हॉलिवूडसाठी चित्रपट बनवण्याचे स्वप्न आता पाहू शकत नाही
बी सुभाष यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोनाच्या आधी त्यांनी 'डिस्को डान्स'च्या रिमेकच्या संदर्भात एका हॉलिवूड प्रोडक्शन कंपनीसोबत करार केला होता. नव्या कलाकारांना घेऊन ते हा चित्रपट बनवणार होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला. ते म्हणाले, 'हॉलिवूडसाठी चित्रपट बनवण्याचे माझे स्वप्न होते. मात्र आता मी आणखी स्वप्न पाहू शकत नाही. कुटुंब प्रथम, नंतर सगळे काही. सिनेइंडस्ट्रीतील लोकही बी सुभाष यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर बी सुभाष यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.