Death Anniversary : ‘तो’ अपमान जिव्हारी लागला अन् मीना कुमारी प्रचंड खचली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:00 AM2021-03-31T08:00:00+5:302021-03-31T08:00:02+5:30

बॉलिवूडने मीना कुमारीला ‘ट्रजेडी क्विन’चा किताब (?) दिला. पण प्रत्यक्षात मीना कुमारीचे आयुष्यही कुठल्या ‘ट्रॅजिडी’पेक्षा कमी नव्हते.

Death Anniversary meena kumari love story with dharmendra | Death Anniversary : ‘तो’ अपमान जिव्हारी लागला अन् मीना कुमारी प्रचंड खचली!!

Death Anniversary : ‘तो’ अपमान जिव्हारी लागला अन् मीना कुमारी प्रचंड खचली!!

googlenewsNext
ठळक मुद्देमीना कुमारी कमालीची सुंदर होती. अनेक कलाकार तिच्या सौंदर्यावर मोहित झालेत.  पण मीना कुमारी नामवंत दिग्दर्शक कमाल अमरोहीवर भाळली.

बॉलिवूडची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. बॉलिवूडने मीना कुमारीला ‘ट्रजेडी क्विन’चा किताब (?) दिला. पण प्रत्यक्षात मीना कुमारीचे आयुष्यही कुठल्या ‘ट्रॅजिडी’पेक्षा कमी नव्हते. 1972 साली आजच्याच दिवशी (31 मार्च) मीना कुमारीने जगाचा निरोप घेतला होता.

मीना कुमारी... तिचे खरे नाव महजबी बानो होते. तिचे वडील अली बख्त पारसी रंगमंचाचे कलाकार होते. मीनाला आधीच दोन बहिणी होत्या. त्यातच घरी अठरा विश्वे दारिद्रय. यामुळे वडिलांनी मीनाला जन्मताच एका मुस्लिम अनाथ आश्रमात सोडले. पण आईने रडून आकांत केल्यावर तिला परत आणले. यामुळे मीनाच्या मनात वडिलांबद्दल राग होता. 

बालकलाकार म्हणूनच मीना कुमारीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. खरे तर कोवळ्या वयात   कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला चित्रपटात काम करावे लागले. 1939 साली आलेला ‘लेदरफेस’या  चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करणारी मीना केवळ सहा वर्षांची होती.   या चित्रपटासाठी तिला पंचवीस रुपये मानधन मिळाले होते. पुढच्याच सहा-सात वर्षांत म्हणजे, उण्यापुºया 13-14  वर्षांत मीनाकडे नायिकेच्या भूमिका चालून येऊ लागल्या. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण मीना कुमारीने  काही गाणीही  गायली.   विजय भट्ट यांनीच तिला ‘बैजू बावरा’मध्ये प्रमुख भूमिका देऊन प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविले. 1952 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईत एकाच थिएटरमध्ये शंभर आठवडे चालून एक रेकॉर्ड नोंदविला होता. याच वेळी फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात झाली आणि मीना कुमारीने पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे लागोपाठ बारा पुरस्कार पटकावणारी मीना कुमारी ही पहिली अभिनेत्री. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली.

बॉलिवूडमध्ये मीना कुमारीने खूप मोठे नाव कमावले. दिलीप कुमारपासून राजकुमार असे सगळे स्टार तिच्यापुढे आपले डायलॉग विसरत, असे म्हटले जाते. ‘पाकिजा’मध्ये मीनाकुमारीसोबत ट्रेनमधील सीन शूट करताना राजकुमारने मीरा कुमारीचे पाय जवळून बघितले आणि मग तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला. 

मीना कुमारी कमालीची सुंदर होती. अनेक कलाकार तिच्या सौंदर्यावर मोहित झालेत.  पण मीना कुमारी नामवंत दिग्दर्शक कमाल अमरोहीवर भाळली. तिला कमालमध्ये प्रथमच नि:स्वार्थ प्रेमभावना दिसली. ती कमालवर इतकी भाळली की तिने त्यांच्याशी लग्न केले. पण हे कमाल यांचे दुसरे लग्न होते. त्यामुळे मीना कुमारी कमाल यांची दुसरी पत्नी म्हणूनच वावरली. दहा वर्षे दोघेही सोबत राहिले. पण कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत आणि 1964 मध्ये मीना कुमारी कमालपासून वेगळी झाली. या विभक्त होण्यामागे कारण होते, धर्मेन्द्र.

त्याकाळी मीना कुमारी यशाच्या शिखरावर होती तर धर्मेन्द्र करिअरच्या पहिल्या टप्प्यावर होता. धर्मेन्द्रचे करिअर सावरता सावरता मीना कुमारी त्याच्या जवळ आली आणि प्रेमात पडली. धर्मेन्द्रला मोठे करण्यात मीना कुमारीने कुठलीही कसर सोडली नाही. पण याबदल्यात तिला मिळाला एकटेपणा. होय, ‘फूल और कांटे’च्या अपार यशानंतर धर्मेन्द्रने मीना कुमारीपासून अंतर राखणे सुरु केले आणि मीना कुमारी एकटी झाली. धर्मेन्द्रने दिलेला हा ‘धोका’ मीना कुमारी सहन करू शकली नाही. धर्मेन्द्रने एकदा सर्वांसमोर मीना कुमारीला थप्पड मारली होती, असे म्हटले जाते. हा अपमान मीना कुमारी अखेरपर्यंत विसरू शकली नाही. धर्मेंद्रपासून वेगळे व्हावे लागणे तिला सहन झाले नाही. याकाळात ती दारुच्या व्यसनाच्या आधीन झाली. अति दारु पिल्यामुळे तिचे लिव्हर खराब झाले.

अभिनेता अशोक कुमार यांना मीना कुमारीची ही स्थिती बघवत नव्हती. त्यांनी तिच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले होते. ते एकदिवस तिच्यासाठी औषधंही घेऊन गेले होते. पण मीना कुमारीने ते घेण्यास नकार दिला होता. ‘पाकिजा’ रिलीज झाल्याच्या तीन आठवड्यानंतर मीना कुमारी गंभीर आजारी पडली. 28 मार्च 1972 रोजी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुस-या दिवशी मीना कुमारीच्या तोंडून अखेरचे कमाल अमरोहीचे नाव बाहेर पडले. यानंतर ती कोमात गेली. उण्यापु-या 39 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. 

Web Title: Death Anniversary meena kumari love story with dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.