Death Anniversary : मीना कुमारीला ओळखू शकले नव्हते लाल बहादूर शास्त्री; विचारले होते, ही महिला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:09 AM2019-03-31T11:09:07+5:302019-03-31T11:09:54+5:30
भारतीय सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली.
भारतीय सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली.
बालकलाकार म्हणूनच मीना कुमारीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. खरे तर कोवळ्या वयात कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला चित्रपटात काम करावे लागले. १९३९ साली आलेल्या ‘लेदरफेस’या चित्रपटात बाल कलाकार म्हणून झळकणारी मीना कुमारी केवळ सहा वर्षांची होती. या चित्रपटासाठी तिला पंचवीस रुपये मानधन मिळाले होते. पुढच्याच सहा-सात वर्षांत म्हणजे, उण्यापुºया १३-१४ वर्षांत मीनाकडे नायिकेच्या भूमिका चालून येऊ लागल्या. विजय भट यांनी तिला ‘बैजू बावरा’मध्ये प्रमुख भूमिका देऊन प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविले. १०५२ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईत एकाच थिएटरमध्ये शंभर आठवडे चालून एक रेकॉर्ड नोंदविला होता. याच वेळी फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात झाली आणि मीना कुमारीने पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे लागोपाठ बारा पुरस्कार पटकावणारी मीना कुमारी ही पहिली अभिनेत्री.
त्या काळात मीना कुमारी प्रसिद्धीच्या शिखरावर होती. पण नेमक्या अशावेळी ही महिला कोण? असे या अभिनेत्रीबद्दल कुणी विचारले तर ? नेमके हेच मीना कुमारीबद्दल झाले. होय, त्या काळात एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणा-या मीना कुमारीला भारताचे दुसरे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री ओळखू शकले नव्हते.
मुंबईच्या एका स्टुडिओत शास्त्रीजींना ‘पाकिजा’चे शूटींग पाहण्याचे निमंत्रण दिले गेले होते. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खुद्द हे निमंत्रण दिले होते. त्यामुळे शास्त्रीजी नाही म्हणू शकले नाहीत आणि ते शूटींग पाहायला स्टुडिओमध्ये पोहोचले. कुलदीप नायर यांनी ‘On Leaders and Icons: From Jinnah to Modi’ या आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.
त्यांनी लिहिले आहे की, ‘ लाल बहादूर शास्त्री स्टुडिओत पोहोचले. त्यावेळी स्टुडिओत अनेक दिग्गज उपस्थित होते. मीना कुमारी लाल बहादूर शास्त्री यांच्या स्वागतासाठी पुढे आली आणि अचानक शास्त्रीजींनी अतिशय विनम्रपणे ही महिला कोण? असे मला (कुलदीप नायक)विचारले. मला आश्चर्याचा धक्का बसला. ही मीना कुमारी, असे मी शास्त्रीजींना हळूच सांगितले. पण शास्त्रीजींना तरीही तिला ओळखले नाही. यानंतर शास्त्रीजी भाषणासाठी उभे राहिले. मीना कुमारीजी, मला माफ कराल. पण मी तुमचे नाव पहिल्यांदा ऐकले, असे शास्त्रीजी म्हणाले. हिंदी सिनेमाची एक दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी त्यावेळी उपस्थितांच्या पहिल्या रांगेत बसली होती. शास्त्रीजींचे ते शब्द ऐकून ती खजिल झाली होती.’
बॉलिवूडमध्ये मीना कुमारीने खूप मोठे नाव कमावले. दिलीप कुमारपासून राजकुमार असे सगळे स्टार तिच्यापुढे आपले डायलॉग विसरत, असे म्हटले जाते. ‘पाकिजा’मध्ये मीनाकुमारीसोबत ट्रेनमधील सीन शूट करताना राजकुमारने मीरा कुमारीचे पाय जवळून बघितले आणि मग तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला.
मीना कुमारी कमालीची सुंदर होती. अनेक कलाकार तिच्या सौंदर्यावर मोहित झालेत. पण मीना कुमारी नामवंत दिग्दर्शक कमाल अमरोहीवर भाळली. इतकी की, तिने त्यांच्याशी लग्न केले. पण हे कमाल यांचे दुसरे लग्न होते. कमाल यांची दुसरी पत्नी म्हणून मीना कुमारी वावरली. दहा वर्षे दोघेही सोबत राहिले. पण कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत आणि १९६४ मध्ये मीना कुमारी कमालपासून वेगळी झाली.
‘पाकिजा’ रिलीज झाल्याच्या तीन आठवड्यानंतर मीना कुमारी गंभीर आजारी पडली. २८ मार्च १९७२ रोजी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुस-या दिवशी मीना कुमारीच्या तोंडून अखेरचे कमाल अमरोहीचे नाव बाहेर पडले.यानंतर ती कोमात गेली. उण्यापु-या ३९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.