Deepika Padukone : “शाहरूख व मी…”; 'पठाण'च्या 'बेशरम रंग' वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पादुकोण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:52 PM2023-03-01T14:52:30+5:302023-03-01T14:56:50+5:30
Deepika Padukone ON Pathaan Controversy: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभर रान माजलं होतं. या संपूर्ण वादादरम्यान शाहरूख व दीपिका दोघांनीही शांत राहणं पसंत केलं. या वादावर दोघांपैकी एकानेही ना कुठलं वक्तव्य केलं, ना याचा कुठल्याही प्रकारे निषेध नोंदवला...
Deepika Padukone ON Pathaan Controversy: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. भारतातच नाही तर विदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. पण रिलीजआधी ‘पठाण’वरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभर रान माजलं होतं. याविरोधात हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. ठिकठिकाणी शाहरूख व दीपिकाच्या पोस्टर्सची होळी करण्यात आली होती. सोशल मीडियावरही बायकॉट मोहिम राबवली गेली होती. या संपूर्ण वादादरम्यान शाहरूख व दीपिका दोघांनीही शांत राहणं पसंत केलं. या वादावर दोघांपैकी एकानेही ना कुठलं वक्तव्य केलं, ना याचा कुठल्याही प्रकारे निषेध नोंदवला. आता इतक्या दिवसानंतर दीपिकाने अशाप्रकारे शांत राहण्यामागचं कारण सांगितलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दीपिका ‘पठाण’ वादावर बोलली. या संपूर्ण वादावर मौन बाळगण्यामागच्या कारणांचा खुलासा तिने केला.
दीपिका म्हणाली...
त्या काळात शाहरूख व मी आम्ही दोघंही गप्प बसलो कारण, यापेक्षा दुसरा कोणताही योग्य पर्याय आमच्याकडे नव्हता. मला वाटतं, आम्ही असेच आहोच. कुटुंबाने आम्हाला जे काही संस्कार दिलेत, आम्ही तसेच आहोत. आम्ही दोघंही आपआपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलो होतो. कमिटमेंट्स, अथक परिश्रम आणि विनम्रता हे गुण आमच्यात आहेत आणि याच गुणांनी आज आम्ही या स्थानी आहोत. यात काही आमचे अनुभव आहेत, काही वयानुसार आलेली प्रगल्भता आहे. शाहरूख व मी आम्ही दोघंही ॲथलीट होतो. शाहरूख शाळा कॉलेजात स्पोर्ट्स खेळायचा. स्पोर्ट्स तुम्हाला संयम ठेवायला शिकवतो. आम्ही हाच संयम दाखवला, असं दीपिका म्हणाली.
शाहरूख व माझं नातं...
शाहरूखसोबतच्या नात्यावरही ती बोलली. ती म्हणाली, १५ वर्षांपूर्वी शाहरूख एक सुपरस्टार होता. त्यावेळी त्याने माझ्यासारख्या नवख्या मुलीवर विश्वास दाखवला. माझ्याकडे ना अनुभव होता, ना इंडस्ट्रीत माझा कुणी गॉडफादर होता. विना ऑडिशन त्याने मला त्याच्या अपोझिट संधी दिली. शाहरूख व मी आम्ही न बोलताही एकमेकांच्या भावना समजतो.