'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: February 24, 2025 12:22 IST2025-02-24T12:21:50+5:302025-02-24T12:22:15+5:30
'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय

'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल
'छावा' सिनेमाची ((chhava movie) सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. 'छावा' सिनेमाने २५० कोटींहून जास्त व्यवसाय केलाय. 'छावा' सिनेमाची सध्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात चांगलीच हवा आहे. अनेकजण सिनेमाचं कौतुक करत आहेत. अशातच 'छावा' सिनेमातील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा सीन 'छावा'मधून वगळण्यात आलाय. 'छावा'मधील या डिलीटेड सीनमध्ये सोयराबाई आणि हंबीरमामा यांच्यातील संवाद दिसतोय.
'छावा'मधील डिलीटेड सीनमध्ये काय?
'छावा' सिनेमातील डिलीटेड सीनमध्ये सोयराबाई राजाराम महाराजांजवळ येतात. मागे हंबीरमामा दाराबाहेर उभे असतात. सोयराबाईंनी छत्रपती शंभूराजांच्या मागे कटकारस्थान केल्याचा खुलासा होतो. तेव्हा हंबीरमामा बहिणीला जाब विचारण्यासाठी येतात. तेव्हा सोयराबाई त्या राजमाता आहेत याची जाणीव करुन देतात. हंबीरमामा त्यांना राजमाता हे पद कसं मिळालं, हे सांगून त्यांची कानउघडणी करतात. शंभूराजेंच्या शासनात राहण्यापेक्षा मी कैदेत राहणं पसंत करेन, असं सोयराबाई त्यांना सांगतात. तुम्ही स्वार्थ, अहंकार, लोभ आदी गोष्टींच्या कैदेत आहातच, असं म्हणत सोयराबाईंना त्यांच्या दुष्ट वागण्याची जाणीव करुन देतात.
पुढे सोयराबाई राजाराम महाराजांकडे बघतात. आईचं वागणं न पटल्याने राजाराम महाराज तिथून निघून जातात. सोयराबाई त्यांना हाक मारतात पण राजाराम महाराज थांबत नाहीत. 'छावा'मधील हा उत्कृष्ट सीन भारतीय आवृत्तीमध्ये पाहायला मिळत नाहीये. भारताबाहेर जिथे 'छावा' रिलीज झालाय तिथे हा सीन दाखवण्यात आला आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री दिव्या दत्ता या सोयराबाईंच्या भूमिकेत तर अभिनेते आशुतोष राणा हंबीरमामांच्या भूमिकेत दिसत आहेत.