G-20 संमेलनासाठी दिल्लीतील थिएटर्स बंद, पण किंग खानच्या 'जवान'ला भीती नाही; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:39 IST2023-09-06T11:59:19+5:302023-09-06T12:39:37+5:30
G-20 संमेलनासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मात्र याचा परिणाम 'जवान'च्या कमाईवर होईल?

G-20 संमेलनासाठी दिल्लीतील थिएटर्स बंद, पण किंग खानच्या 'जवान'ला भीती नाही; कारण...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे खूपच चर्चेत आहे. ३०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शाहरुख वेगवेगळ्या प्रकारे सिनेमाचं प्रमोशन करत आहे. नुकतंच त्याने वैष्णोदेवी आणि व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. 'जवान'मधून शाहरुख आपलाच सिनेमा 'पठाण'चाही रेकॉर्ड मोडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र G-20 समिटमुळे दिल्लीतील काही थिएटर्स बंद असणार आहेत. याचा फटका 'जवान'ला बसणार का अशी भीती आहे.
G 20 संमेलनासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मात्र याचा परिणाम 'जवान'च्या कमाईवर होऊ शकतो. कारण दिल्लीतील काही सिनेमागृह बंद ठेवण्यात येतील. याचा थेट परिणाम 'जवान'च्या कमाईवर होईल असा अंदाज आहे. 'जवान' ७ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. तर ९ आणि १० सप्टेंबर रोजी G20 संमेलन आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख उपस्थित असतील. विकेंडला दिल्लीत नेहमीसारखंच सगळं सुरु असेल मात्र सुरक्षेच्या दृष्टीने एनडीएमसीने काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये पीव्हीआरचे चार थिएटर्स बंद असणार आहेत. मध्य दिल्लीत असणारे पीव्हीआर प्लाझा, पिव्हीआर रिवोली, ओडियन आणि ईसीएक्स चाणक्यपुरी हे थिएटर्स बंद असतील.
'जवान'वर थेट परिणाम नाही?
माध्यम रिपोर्ट्सनुसार, G20 साठी जे थिएटर्स बंद करण्यात येणार आहेत ते सगळे सिंगलस्क्रीन थिएटर्स असतील. त्यांची क्षमता २००० पेक्षा जास्त नाही. त्यामुळे फिल्मच्या कमाईवर जास्त परिणाम दिसणार नाही असं थिएटर मालकांनी स्पष्ट केलं आहे.
पहिल्याच दिवशी करेल इतकी कमाई
'जवान'ची क्रेझ पाहता सिनेमा पहिल्याच दिवशी तेजीत कमाई करेल. ओपनिंग डे लाच सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडेल असा अंदाज आहे. 'पठाण'चा रेकॉर्ड तोडत 'जवान' पहिल्याच दिवशी 70 कोटींचा बिझनेस करु शकतो.
'जवान' चं दिग्दर्शन साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारने केलं आहे. यामध्ये साऊथ कलाकारांची मांदियाळी आहे. साऊथ ब्युटी नयनतारा आणि शाहरुखचा रोमान्स सिनेमात पाहता येणार आहे. दीपिका पदुकोणचाही स्पेशल अॅपिअरन्स आहे.