देव आनंद यांचा जादुई 'काळा कोट', तरुणी प्रेमात वेड्या अन् कोर्टाची बंदी, काय आहे किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:11 PM2023-09-26T13:11:48+5:302023-09-26T13:24:20+5:30
देव आनंद यांचा लूक, स्टाईल आणि पडद्यावरील रोमँटिक इमेजमुळे मुली त्यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या.
'अभी न जाओ छोड़कर..', 'खोया खोया चांद..', 'आंखों ही आंखों में इशारा हो गया..', 'है अपना दिल तो आवारा..', 'दिल पुकारे आरे-आरे-आरे..' अशा अनेक गाण्यातून अभिनेते देव आनंद यांनी सदाबहार अभिनयाने, स्टाइलने तरुणींना भुरळ घातली होती. देवानंद यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणी आतूर असायच्या. देव आनंद यांचा लूक, स्टाईल आणि पडद्यावरील रोमँटिक इमेजमुळे मुली त्यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. विशेष म्हणजे देव आनंद जेव्हा काळ्या रंगाचा सुट घालायचे, तेव्हा तर तरुणी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकण्यास तयार असायच्या.
दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ साली झाला. देव आनंद यांची आज १००वी जयंती आहे. देव आनंद आज आपल्यात नसले तरी त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से आहेत. असाच एक काळ्या कोटसंदर्भातील त्यांचा किस्सा फारच गाजलेला आहे. तर झाले होते असे की, १९५८ साली 'काला पानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यामधील देव आनंद यांचा काळ्या कोटमधील लूक चर्चेत आला होता.
जेव्हा-जेव्हा देव आनंद काळा कोट घालून बाहेर पडायचे तेव्हा मुली बेभान व्हायच्या. अस म्हटलं जातं की, देव आनंद यांच्या प्रेमात मुली इतक्या वेड्या होत्या की अनेक मुलींनी आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलं होतं तर काही तरुणी रक्ताने पत्र लिहून पाठवायच्या.
देव आनंद यांच्या काळ्या कोटाचे मुलींमध्ये इतके आकर्षण होते की, कोर्टाने त्यांच्या या कोट घालण्यावर बंदी घातली होती. पण, खर तर ही एक अफवा होती. देव आनंद यांनी त्यांच्या रोमांसिंग विथ लाइफ (Romancing with life) या आत्मचरित्रात त्यांनी लिहलं, "असे काहीही नव्हते ती एक अफवा होती". अर्थातच न्यायालयाचा तसा काहीही आदेश नव्हता.
देव आनंद यांचे तरुणींमध्येच नव्हे तर तरुणांमध्येही त्यांचे वेड होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्यांची स्टाइल कॉपी करण्याचे प्रमाण अधिक होते. देव आनंद यांनी ६ दशकं सिनेसृष्टीवर त्यांच्या अभिनयाने राज्य केलं. देव आनंद यांच्या अभिनय आणि संवाद कौशल्यावर प्रेक्षक फिदा होते. देव आनंद त्यांच्याकडे त्याकाळी फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जायचे.