देव पटेलने हॉटेल मुंबईमधील भूमिकेसाठी घेतली ही मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 06:30 AM2019-10-31T06:30:00+5:302019-10-31T06:30:01+5:30
हॉटेल मुंबई या चित्रपटात देव पटेल अर्जुन या शीख समाजातील मुलाची भूमिका साकारत आहे.
आपल्या शौर्याने लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूरांची कथा आपल्याला हॉटेल मुंबई या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटात देव पटेल, अनुपम खेर, ॲर्मी हॅमर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 29 नोव्हेंबर 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲन्थोनी मारस करत आहे.
या चित्रपटात देव पटेल अर्जुन या शीख समाजातील मुलाची भूमिका साकारत आहे. तो या हॉटेलमध्ये शेफ हेमंत ऑबेरॉय यांच्यासोबत काम करतो असे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी देवने प्रचंड मेहनत घेतली आहे. देवचा जन्म इंग्लडमध्ये झाला असून तो लहानाचा मोठा देखील तिथेच झाला आहे. तसेच तो गुजराती असल्यामुळे शीख मुलाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. मुंबईत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यात शीखांनी दाखवलेल्या साहसामुळे देवच्या मनात त्यांच्याबाबत प्रचंड आदर आहे. या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी केली याबद्दल देव सांगतो, मी माझे कोच रघुवीर जोशी यांच्यासोबत भाषेवर एक महिना तरी मेहनत घेतली. उच्चार योग्य व्हावेत यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. ही भूमिका काल्पनिक असल्याने त्या भूमिकेचा अभ्यास करणे कठीण होते. या भूमिकेसाठी हिंदी आणि पंजाबी भाषेवर मी खूप मेहनत घेतली. ही कथा माझ्या खूपच जवळची आहे. कारण मी एका महिन्यासाठी मुंबईत चित्रीकरण करत होतो आणि त्याचवेळी मुंबईत हा हल्ला झाला होता. माझ्या आई वडिलांना या हल्ल्याविषयी टिव्हीवर पाहून धक्काच बसला होता.
मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर हा चित्रपट आधारित असून जवानांसोबतच सामान्य लोकांनी देखील प्राणाची पर्वा न करता इतर लोकांचा जीव कसा वाचवला हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 72 तास चाललेल्या ऑपरेशनदरम्यान 1600 जणांचे प्राण वाचवण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि पर्पज एन्टरटेन्मेंटने केली आहे.