‘देवदास’ मनाचा ठाव घेणारे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 02:14 PM2018-10-24T14:14:47+5:302018-10-25T08:00:00+5:30
देवदास ही सरत चंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी बहुधा भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. आता एजीपी वर्ल्ड या कथेची भव्य व्यापकता रंगमंचावर आणत आहे.
देवदास ही सरत चंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी बहुधा भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कथेला भारतीय सिनेमातही नावाजले गेले आहे. आता एजीपी वर्ल्ड या कथेची भव्य व्यापकता रंगमंचावर आणत आहे.
एजीपी वर्ल्डच्या या रंगमंचीय रुपांतरणाला एक वैश्विक रूप देण्यात आले. या नाटकातील एक मुख्य पात्र असलेली, सुंदर, आकर्षक वारांगना चंद्रमुखी ही कथा सांगणार आहे. अप्रतिम नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून हा संपन्न वारसा प्रेक्षकांची मने जिंकून घेणार आहे. सैफ हैदर हसन यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात गौरव चोप्रा, मंजिरी फडणीस, सुनील पालवाल, सुखदा खांडकेकर, भावना पाणी, स्मिता जयकर हे कलाकार आहेत. हा १५० मिनिटांचा भव्य मल्टिस्टारर प्रयोग म्हणजे विशुद्ध प्रेमाचे सादरीकरण आहे. देवदासनंतर चंद्रमुखी आणि पारोचे काय झाले, अशी वेगळीच बाजू एजीपीने यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१९०० सालातील कोलकात्यात घडणारी ही कथा दृश्यात्मक आणि सांगीतिक स्वरुपावर अतिशय भव्य असणार आहे. त्या काळी भारतात असणाऱ्या भव्य हवेल्या, गॅस बत्त्यांच्या प्रकाशातील कोलकात्यातील रस्ते असा सगळा सरंजाम घेऊन त्या काळातील चित्र साकारले जाणार आहे. एकुणातच हा प्रयोग भव्य असणार आहे. आकर्षक कलाकुसर, आठवणी ताज्या करणारी प्रकाशयोजना, तपशीलवार कपडेपट संस्मरणीय संगीत आणि श्वास रोखायला लावणारे नृत्यदिग्दर्शन- भारतात बहुधा इतकी भव्यदिव्य, सुंदर आणि श्वास रोखायला लावणारी निर्मिती घडलेली नाही. रंगमंचीय रुपांतरण आणि दिग्दर्शन सैफ हैदर हसन यांनी केले आहे. मूळ संहितेवर काम करून त्यातून संगीत, संवाद, नृत्य आणि नाट्य यातून प्रेक्षकांच्या मनाला हात घालेल अशी सहजसुंदर कलाकृती निर्माण करणे, हे त्यांचे कसब भारतीय नाट्यक्षेत्रा नावाजले जाते. मेरी कोम, भूमी, सरबजीत आणि सावरिया या सारख्या सिनेमांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आर्ट आणि सिनेमॅटिक डायरेक्टर ओमंग कुमार यांनी नाटकाचा सेट उभारला आहे.
शंपा सोनथालिया यांनी दिग्दर्शित केलेले शास्त्रीय आणि समकालीन फ्युजन नृत्य हे या नाटकाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. शिवाय, देवदासला लाइव्ह संगीत दिले आहे बर्टविन रवी डीसूझा यांनी. शैल हाडा, भूमी त्रिवेदी, शान, अलका याज्ञिक, सुरेश वाडकर आणि अंतरा मित्रा यांच्यासारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या ओरिजिनल गाण्यांमधून देवदासमधील अमर, एकतर्फी प्रेमकथा सजली आहे. अश्विन गिडवानी आणि एजीपी वर्ल्ड या भारतातील आघाडीच्या थिएटर प्रोडक्शन हाऊसकडून ही भव्य सांगीतिका रंगमंचावर साकार होणार आहे.
या रुपांतरणाबद्दल दिग्दर्शक सैफ हैदर हसन म्हणाले, “सर्व प्रेमकथामंध्ये देवदास म्हणजे ‘बाप’ कथा आहे, असे म्हणता येईल. अपूर्ण तरीही अमर अशा प्रेमाची ही सर्वोत्तम कथा आहे. ही कथा गेली १०० वर्षे आपल्यात आहे. या कथेतील सुंदर काव्य आणि नाट्यमयता यामुळे अनेक भाषांमध्ये यावर सिनेमेही आले. आता पहिल्यांदाच रंगमंचावर सादर होणारी ही कथा आपल्या सर्जनशीलतेने आणि भव्यदिव्यतेने प्रेक्षकांना मोहून टाकेल.”