'रिक्षावाला हिरो झालाय'; दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जावई दिसण्यावरुन झाला होता ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:22 PM2022-07-08T13:22:55+5:302022-07-08T13:23:40+5:30
Dhanush: अलिकडेच एका मुलाखतीत धनुषने त्याच्या दिसण्यावरुन लोकांनी त्याला कसं ट्रोल केलं हे सांगितलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याचा तोंडावर अपमान केला, असंही तो म्हणाला.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर दाक्षिणात्य कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे धनुष (dhanush). सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई असूनही धनुषने त्याच्या गुणवत्तेच्या आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात त्याची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आज अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक अशी ओळख त्याने मिळवली आहे. विशेष म्हणजे साऊथमधील वजदार नाव असलेल्या या अभिनेत्याला एकेकाळी त्याच्या दिसण्यावरुन बरेच ट्रोल केलं होतं.
अलिकडेच एका मुलाखतीत धनुषने त्याच्या दिसण्यावरुन लोकांनी त्याला कसं ट्रोल केलं हे सांगितलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याचा तोंडावर अपमान केला असंही तो म्हणाला. अभिनेता विजय सेतुपतीसोबत चर्चा करत असताना धनुषने त्याला आलेल्या अनुभवाच कथन केलं.
काय म्हणाला धनुष?
"ज्यावेळी मी कादल कोंडन (2003) या चित्रपटाचं शुटिंग करत होतो. त्यावेळी सेटवर काही जणांनी या चित्रपटातील हिरो कोण? असा प्रश्न विचारला होता. त्याच्या या प्रश्नावर मी चित्रपटातील अन्य एका अभिनेत्याकडे हात करत तो आहे असं सांगितलं. कारण, तोंडावर अपमान सहन करायची माझी मानसिक तयारी नव्हती. परंतु, मीच या सिनेमातला मुख्य अभिनेता असल्याचं त्यांना समजलं त्यावेळी ते सगळे माझ्या तोंडावर हसले होते," असं धनुष म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "अनेक जणांनी माझ्या दिसण्यावरुन कमेंट केल्या. यात एक कमेंट मला प्रचंड लागली होती. अरे, त्या रिक्षावाल्याला पाहिलं का तो हिरो आहे, अशी कमेंट एकाने पास केली होती. ही कमेंट ऐकल्यावर मी माझ्या कारमध्ये गेलो आणि खूप रडलो होतो. त्यावेळी माझं वयही फार नव्हतं. त्यामुळे मला हे ट्रोलिंग सहन करायला जमत नव्हतं. त्या काळात असा एकही व्यक्ती नव्हता ज्याने मला दिसण्यावरुन ट्रोल केलं नाही. त्यांच्या कमेंट ऐकून कधी कधी असं वाटायचं खरंच एक ऑटो ड्रायव्हर हिरो होऊ शकतो का?"
दरम्यान, साऊथमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या धनुषने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विशेष म्हणजे आता आता धनुष लवकरच द ग्रे मॅन या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.