अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी हे अभिनेते बनले असते बॉलिवूडचे अँग्री यंगमॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:13 PM2018-08-13T16:13:26+5:302018-08-14T08:00:00+5:30
१९७३ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'जंजीर'मुळे बॉलिवूडला सुपरस्टार लाभला आणि अमिताभ बच्चन यांना अँग्री यंगमॅन म्हणून ओळख मिळाली.
१९७३ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'जंजीर'मुळे बॉलिवूडला सुपरस्टार लाभला आणि अमिताभ बच्चन यांना अँग्री यंगमॅन म्हणून ओळख मिळाली. अभिनेता अमिताभ बच्चन 'जंजीर' चित्रपटामुळे सुपरस्टार बनले. खरे तर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या जागी अभिनय करताना अभिनेते धर्मेंद्र दिसणार होते.
धर्मेंद्र यांनी 'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका टीव्ही शोमध्ये 'जंजीर'चा किस्सा सांगितला. 'जंजीर' चित्रपटाची स्क्रीप्ट लेखक सलीम खान यांनी तयार केली होती. त्यांना या चित्रपटाची कथा लिहायला जावेद अख्तर यांनी मदत केली होती आणि या चित्रपटातून सलीम-जावेद ही जोडी लेखक म्हणून लोकांसमोर आली. सलीम खान यांच्याकडे कथा तयारी होती आणि या कथेचे राइट्स धर्मेंद्र यांनी घेतले. ते स्वतः हा सिनेमा बनवणार होते. काही काळासाठी त्यांनी ही स्क्रीप्ट बाजूला ठेवली होती. त्यांचे मित्र व निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी ती स्क्रीप्ट त्यांच्याकडे मागितली. धर्मेंद्र यांना वाटले की सध्या ते ह्या कथेवर काम करीत नाही आहेत तर प्रकाश यांना देऊयात. म्हणजे हा चित्रपट त्यांनी बनवला तर त्यात ते सहज अभिनय करतील, असे धर्मेंद्र यांना वाटले. 'जंजीर'ची स्क्रीप्ट धर्मेंद्र ह्यांच्यासाठी खास होती. त्यामुळे त्यांना हा चित्रपट सोडायचा नव्हता. त्यांनी प्रकाश मेहरांसोबत 'समाधी' चित्रपटात काम केलेले होते. त्यामुळे धर्मेंद्र जंजीरमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार हे नक्की होते.
त्यावेळी धर्मेंद्र यांच्या कजिन बहिणीने एन्ट्री केली. त्यावेळी धर्मेंद्र यांची बहिण सिनेमा बनवणार होती आणि त्यासाठी प्रकाश मेहरा ह्यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र प्रकाश यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून बहिणीने धर्मेंद्र यांना शपथा देऊन प्रकाश मेहरा यांच्या सिनेमात काम न करायला सांगितले. मग, धर्मेंद्र यांनी प्रकाश यांना 'जंजीर' चित्रपटात काम करण्यास नकार दिला. या सिनेमासाठी प्रकाश यांना नायक शोधण्यासाठी खूप त्रास झाला. त्यांनी देव आनंद, दिलीप कुमार, राजकुमार यांनाही या सिनेमासाठी विचारले. पण, कोणीच होकार दिला नाही आणि धर्मेंद्र यांना ह्या चित्रपटात काम करायचे असतानाही सिनेमासाठी होकार देऊ शकले नाही. त्रस्त झालेल्या प्रकाश यांनी नवोदित अभिनेता अमिताभ बच्चन यांना जंजीर चित्रपटात घेतले. त्यानंतर नवा इतिहास बनला. जंजीर चित्रपटानंतर बॉलिवूडला अँग्री यंगमॅन मिळाला. कदाचित अँग्री यंगमॅन अमिताभ बच्चन नसते तर धर्मेंद्र असले असते.