'धूम' सिनेमाच्या कॅमेऱ्यामागचा चेहरा हरपला, दिग्दर्शक संजय गढवी यांचं ५७ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:44 PM2023-11-19T12:44:21+5:302023-11-19T12:59:17+5:30
संजय गढवी हे बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली दिग्दर्शक होते.
'धूम' आणि 'धूम 2' सारखे ब्लॉकबस्टर हिट देणारे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचं निधन झालं आहे. ते ५७ वर्षांचे होते. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरीच चहा पिताना ते अचानक जमिनीवर कोसळले. हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुंबईतील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संजय गढवी हे बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली दिग्दर्शक होते. 'धूम' सिरीजमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. ते मुंबईच्या अंधेरी भागातील 'ग्रीन एकर्स' बिल्डिंगमध्ये वास्तव्यास होते. घरात बेशुद्धावस्थेत पडल्यानंतर त्यांना तात्काळ कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. सध्या त्यांचं पार्थिव रुग्णालयातच आहे.
दिग्दर्शक संजय गढवी यांनी २००० साली 'तेरे लिए' मधून पदार्पण केले. मात्र त्यांना खरी ओळख २००४ साली आलेल्या 'धूम' चित्रपटामुळे मिळाली. यामध्ये अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि जॉन अब्राहम यांचे जबरदस्त अॅक्शन सीन्स होते. सिनेमा सुपरहिट ठरला. या ब्लॉकबस्टर सिनेमाचे टॅलेंटेड दिग्दर्शकाने मात्र आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.