Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 04:50 PM2023-02-05T16:50:52+5:302023-02-05T17:04:10+5:30
Kangana Ranaut : कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेलं नाही. पण तिचा इशारा रणबीर कपूर व आलिया भटकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूडवर आगपाखड करणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने पुन्हा एकदा नेपोकिडवर हल्लाबोल केला आहे. होय, कंगनाने एक भलीमोठी इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने एक ‘नेपोकिड’ व त्याच्या पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेलं नाही. पण तिचा इशारा रणबीर कपूर व आलिया भटकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
काय म्हणाली कंगना, काय आहेत तिचे आरोप?
कंगना लिहीते. ‘मी जिथे जातो तिथे माझा पाठलाग केला जातो आणि हेरगिरी केली जाते. फक्त रस्त्यावरच नाही तर माझ्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि घराच्या टेरेसवरही माझा पिच्छा केला जातो. मला कॅप्चर करण्यासाठी ते झूम लेन्स लावतात. प्रत्येकाला माहित आहे की, टिप मिळाली असेल तरच पापाराझी स्टार्सला कॅप्चर करायला पोहोचतात. आता त्यांनी माझे फोटो क्लीक करायला सुरुवात केलीय. यासाठी माझी टीम किंवा मी त्यांना पैसे देत नाही मग त्यांना कोण पैसे देत आहे? सकाळी मला 6:30 वाजता क्लिक केलं गेलं. त्यांना माझं शेड्युल कसं कळतं? ते या फोटोंचं काय करतात? आज मी पहाटे कोरियोग्राफी सेशन केलं. मी तिथे येणार आहे, हे कोणालाही ठाऊक नव्हतं. पण तरिही रविवार असूनही पापाराझींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. मला खात्री आहे की, माझा व्हॉट्सअॅप डेटा, माझ्या पर्सनल गोष्टी, माझ्या प्रोफेशनल डील्सही लीक केल्या जात आहेत. त्या एका वेड्या नेपो माफियाला माझ्याबद्दल सगळं माहित आहे. जो एकदा न बोलवता माझ्या दारात आला होता आणि ज्याने मला बळजबरीने भेटायचा प्रयत्न केला होता. तो स्त्रियांना भुलवण्यात पटाईत असलेला कॅसानोव्हा आहे. आता तो नेपो माफिया ब्रिगेडचा उपाध्यक्ष झाला आहे.
त्याने त्याच्या बायकोला निर्माती होण्यासाठी भाग पाडलं. इतकंच नाही तर त्याच्या बायकोने स्त्री प्रधान करावेत, माझ्यासारखे कपडे घालावेत, यासाठीही बायकोला भाग पाडलं. अगदी माझ्यासारखं घराचं इंटिरिअरही त्याने बनवलं. माझ्या स्टायलिस्टला आणि होम स्टायलिस्टलाही स्वत:कडे नियुक्त केलं. त्याची बायको त्याच्या या वेडेपणाला प्रोत्साहन देतं आहे. मी माझ्या भावाच्या रिसेप्शनमध्ये नेसले अगदी तशीच साडी ती तिच्या लग्नात नेसली. हे भितीदायक आहे... अलीकडेच माझ्यासोबत दशकभरापासून असलेला माझा एक कॉस्च्युम डिझाईनर मित्र माझ्याशी भांडला. योगायोग म्हणजे, माझं काम सोडून तो त्यांच्याकडे कामाला गेला. माझे फायनान्सर किंवा बिझनेस पार्टनर शेवटच्या क्षणी डील रद्द करतात. माझ्यामते, हा कट आहे. तो मला एकट पाडण्याचा, मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. ’
ते दोघे वेगवेगळ्या मजल्यावर राहतात...
ती पुढे लिहिते, ‘आणखी एक गोष्ट सांगते तो तिला वेगळ्या मजल्यावर ठेवतो. ते दोघेही एकाच इमारतीत वेगळे राहतात. मी त्याच्या बायकोला सुचवेल की, त्याच्या या वागण्याला तिने लगाम घालावा, त्याच्यावर लक्ष ठेवावं.
त्याला हा सगळा डेटा कसा मिळतो आणि तो त्याचा कसा वापर करतो, यावर लक्ष द्यावं. कारण तो अडचणीत आला तर ती आणि तिचे बाळही अडचणीत येईल... तिने तिच्या आयुष्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तो बेकायदेशीर गोष्टीत गुंतत नाही नाही, हे तिने बघायला हवं.. तुला खूप सारं प्रेम डिअर गर्ल आणि तुझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही खूप खूप प्रेम...’
कंगनाने या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नाही. पण तिचा इशारा रणबीर व आलियाकडे असल्याचं स्पष्ट आहे. कंगनाने याआधीही रणबीर - आलियावर आगपाखड केली होती. रणबीर आणि आलियाचं बाळ हे फक्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे असं कंगना म्हणाली होती.