'सेक्रेड गेम्स २' च्या एपिसोड्सची ही असणार आहेत नावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:44 PM2019-03-28T18:44:08+5:302019-03-28T18:45:25+5:30
सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा सिक्वल प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळणार याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिक्वलची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती.
'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 'सेक्रेड गेम्स'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसिरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत होती. नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता तर नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती.
सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा सिक्वल प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळणार याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या फेसबुक पेजवरून याबद्दल घोषणा करण्यात आली होती.
सेक्रेट गेम्सचा दुसरा सिझन आपल्याला पाहायला मिळणार हे कळल्यानंतर तर प्रेक्षक या वेबसिरिजच्या सिक्वलमध्ये काय काय असणार याविषयी तर्कविर्तक लावत आहेत. आता सेक्रेट गेम्सच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. या नव्या सिझनमधील एपिसोड्सची नावं काय असणार याची घोषणा नेटफ्लिक्सद्वारे करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या फेसबुक पेजवर चार वेगवेगळ्या फोटोंसोबत नावं दिली आहेत. ही नावं एपिसोडची नावे असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
बोलो अहम ब्रम्हासी, छह दिन में सब कुछ दिखाई देने लगेगा या कॅप्शनसह हे चार फोटो शेअर करण्यात आले आहेत. पुढील सहा दिवसांत सगळं काही स्पष्ट होईल असे त्यासोबत लिहिले असल्याने सहा दिवसांनी काय घडणार आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या वेबसिरिजचा दुसरा भाग कधीपासून प्रदर्शित होईल याची घोषणा सहा दिवसांनी करण्यात येईल असे काही नेटिझन्सचे म्हणणे आहे तर काही जण या दिवशी सेक्रेट गेम्स २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे विचार प्रतिक्रियांद्वारे मांडत आहेत. बिदल ए गीता, कथम अस्ति, अन्तर महावन आणि अनागमम अशी या भागांची नावे असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रेक्षकांची लाडकी 'सेक्रेड गेम्स २' वेबसिरिज जून ते ऑगस्टच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून 'सेक्रेड गेम्स' चा हा दुसरा भाग इतका दमदार असणार आहे की, प्रेक्षक या वेबसिरिजचा पहिला भाग विसरून जातील असे नवाझुद्दीनने त्याच्या मुलाखतीत नुकतेच सांगितले होते.
सेक्रेड गेम्स या वेबसिरिजच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुसऱ्या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. या सिझनविषयी 'सेक्रेड गेम्स २'चा कास्टिंग डायरेक्टर शिवम गुप्ता सांगतो, 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तितकेच दमदार कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती तर सरताज सिंग या भूमिकेत सैफ अली खान झळकला होता. या दोघांच्या अभिनयाच्या आणि लूकच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या वेबसिरिजच्या पहिल्याच भागात गायतोंडेची हत्या झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याची हत्या का झाली, कशाप्रकारे करण्यात आली, त्याच्या हत्येमागे काय रहस्य होते. यातील काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पहिल्या सिझनमध्ये मिळाली होती आणि आता या सिझनमध्ये यामागची अनेक रहस्य उलगडली जाणार आहेत. या सिझनचे चित्रीकरण मुंबईसह केप टाऊन, जोहान्सबर्ग आणि साऊथ आफ्रिकेत झाले आहे.