अमिताभ यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते इतके कमी मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:29 PM2019-11-07T17:29:43+5:302019-11-07T17:33:47+5:30
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आज 50 वर्षं झाले आहेत. त्यांना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आज 50 वर्षं झाले आहेत. त्यांचा सात हिंदुस्तानी हा पहिला चित्रपट 7 नोव्हेंबर 1969 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ यांनी कवी अनवरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नसले तरी या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी अमिताभ यांना किती मानधन मिळाले होते हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आज केवळ एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या अमिताभ यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी केवळ 5000 इतके मानधन मिळाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले.
अमिताभ बच्चन यांना एकेकाळी इंजिनिअर व्हायचे होते. एवढेच नाही तर त्यांनी वायू दलात जाण्याचेही ठरवले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अमिताभ अभिनेते बनले आणि भारतीय चित्रपटसृष्टीला ‘शहेनशहा’ मिळाला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत असून त्यांचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. सध्या त्यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्याला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.