तबस्सुम यांचे रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्यासोबत आहे हे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:29 AM2018-08-10T11:29:40+5:302018-08-10T12:45:39+5:30
तबस्सुम यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी प्रसिद्धी ही फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे मिळाली. या कार्यक्रमात त्या अनेक कलाकारांची मुलाखत घेत असत. त्यांची मुलाखत घेण्याची पद्धत प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
तबस्सुम यांनी गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. रामायण या मालिकेतील राम या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अरुण गोविल आणि तबस्सुम यांच्यात जवळचे नाते आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तबस्सुम यांचे लग्न विजय गोविल यांच्यासोबत झाले आहे. विजय गोविल हे अरुण गोविल यांचे मोठे भाऊ आहेत. या नात्याने तबस्सुम या अरुण गोविल यांच्या वहिनी आहेत.
तबस्सुम यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी प्रसिद्धी ही फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे मिळाली. या कार्यक्रमात त्या अनेक कलाकारांची मुलाखत घेत असत. त्यांची मुलाखत घेण्याची पद्धत प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यांनी केवळ वयाच्या तिसऱ्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. मेरा सुहाग या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्या झळकल्या. त्यांच्या आईने त्यांचे नाव किरण बाला ठेवले होते तर वडिलांनी तबस्सुम. त्यांच्या शाळेत त्यांचे नाव किरण बाला लिहिले गेले असले तरी त्या बेबी तबस्सुम या नावानेच चित्रपटसृष्टीत ओळखल्या गेल्या.
फूल खिले है गुलशन गुलशन ही मालिका दूरदर्शनवर प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. दूरदर्शन २ ऑक्टोबर १९७२ ला लाँच झाले. त्यानंतर सहाच दिवसांत म्हणजेच ८ ऑक्टोबरला या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी त्यांना सुरुवातीला एका भागासाठी ७० रुपये मिळत असत. २१ वर्षं हा कार्यक्रम त्यांनी अविरत सुरू ठेवला. पण इतक्या वर्षांनी देखील त्यांना एका भागाचे केवळ ७५० रुपये मिळत असत. २१ वर्षांत काळ खूप बदलला होता. सूत्रसंचालक एका भागासाठी हजारोने पैसा घेत होते. पण तरीही तबस्सुम यांना खूपच कमी मानधन मिळत होते. त्यामुळे त्यांनी १९९३ मध्ये या कार्यक्रमाला रामराम ठोकला.
तबस्सुम यांच्या आयुष्यातील एक किस्सा त्या कधीच विसरू शकत नाहीत. त्या मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या. त्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. त्यामुळे त्या व्हीलचेअरवरच बसून होत्या. पण त्याचवेळी सभागृहात आग लागली. सगळे सैरावैरा पळू लागले. त्यांना कोणीच मदत करायला पुढे येत नव्हते. पण त्यावेळी अमिताभ बच्चन देखील त्यांच्यासोबत कार्यक्रम करत होते. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तबस्सुम यांना सुरक्षित जागी नेले. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.