जाणून घ्या कोण होत्या गंगूबाई काठियावाडी, आलिया भट साकारणार आहे त्यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:34 PM2021-02-26T17:34:01+5:302021-02-26T17:38:54+5:30
गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ही गंगूबाई कोण होती असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
हुसैन जैदीचे पुस्तक 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'मध्ये गंगूबाईची कहाणी आहे आणि याच पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी नवीन चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियात मोठे नाव होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते.
गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ही गंगूबाई कोण होती असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. गंगूबाईचा जन्म गुजरातमधील काठियावाडी येथे झाला होता. त्यांचे खरे नाव गंगुबाई हरजीवनदास. त्या केवळ 16 वर्षांच्या असताना वडिलांकडे काम करणाऱ्या अकाऊंटटच्या त्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्यासोबत मुंबईला पळून आल्या. पण नवीन आयुष्याचे स्वप्न पाहाणाऱ्या गंगूबाईंना त्यांच्या पतीनेच 500 रुपयांत विकले आणि त्यांना वेश्याव्यसायात ढकलून दिले. मुंबईत वेश्याव्यवसाय करत असताना अनेक कुख्यात गुंड त्यांच्याकडे ग्राहक म्हणून येत असत.
कामाठीपुरा परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे गंगुबाईंचा दरारा वाढला. कुंटणखान्यामध्ये आलेल्या एका पठाणाने गंगुबाईंशी गैरवर्तन केलं होते. त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना शारीरिक इजा तर केली होती, पैसेही दिले नव्हते. हे पुन्हा पुन्हा घडत होते. अखेरीस या पठाणाविषयी गंगूबाईंनी माहिती काढली. त्यावेळी त्या पठाणाचे नाव शौकत खान असून तो करीम लाला गँगचा असल्याचं त्यांना समजलं. त्यावर त्यांनी करिम लालाची भेट घेऊन याविषयी सांगितले. त्यावर करिम लालाने गंगूबाईंचे संरक्षण करण्याचे त्यांना वचन दिले. यानंतर करिम लाला गंगूबाईंना आपली बहीण मानू लागले. करिम लालामुळे गंगूबाईचा कामाठीपुरा परिसरातील दरारा वाढला.
वेश्यांना गंगूबाई आईसारख्या वाटायच्या. तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. मुंबईत फसवून आणल्या जाणाऱ्या अनेक मुलींना त्यांनी घरी परतण्यास मदत केली होती.