Dilip Kumar 100 Birth Anniversary : फोटोत शोधू लागल्या ‘साहेब’..., सायरा बानोंचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 01:13 PM2022-12-11T13:13:21+5:302022-12-11T13:16:47+5:30
Dilip Kumar 100 Birth Anniversary : दिलीप कुमार यांचं पोस्टर बघताच, सायरा त्या पोस्टरजवळ गेल्यात. बराच वेळ त्यांनी त्या पोस्टरवर हात फिरवला....
भारतीय सिनेसृष्टीत ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांची आज 100 वी जयंती. आज दिलीप कुमार आपल्यात नाहीत. 11 डिसेंबर 1900 रोजी जन्मलेल्या दिलीप कुमार यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पीव्हीआरने देशभर फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं आहे. दोन दिवस चालणाऱ्या या फिल्म फेस्टिवलमध्ये दिलीप कुमार यांचे गाजलेले सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिवलमध्ये दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी हजेरी लावली आणि ‘साहेबांच्या’ आठवणीने त्या व्याकूळ झाल्यात. त्यांना अश्रू अनावर झालेत.
स्क्रिनिंगवेळी दिलीप कुमार यांचं पोस्टर पाहून सायरा बानो भावुक झाल्यात. पोस्टर बघताच, सायरा त्या पोस्टरजवळ गेल्यात. बराच वेळ त्यांनी त्या पोस्टरवर हात फिरवला. कसंबसं त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चाहतेही हा व्हिडीओ पाहून भावुक झालेत. खरंच, हे खऱ्या प्रेमाचं एक अप्रतिम उदाहरण आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली. कदाचितच कुणाला कुणावर इतकं प्रेम असेल, असं एका युजरने लिहिलं.
1966 साली दिलीप आणि सायरा बानो यांनी विवाह केला होता. दिलीप आणि सायरा दोघांच्या वयातही 22 वर्षांचं अंतर होतं. तरीही त्यांच्या प्रेमात वयाचा फरक नात्यामध्ये येऊ शकला नाही. याउलट दोघांचं नातं दिवसेंदिवस घट्ट बनत गेलं होतं.
The "Dilip Kumar: Hero of Heroes" Film Festival is now in motion! The ceremonial lamp at Juhu PVR was lit by Saira Banu, Ramesh Sippy, Waheeda Rehman, Asha Parekh & others.
— Film Heritage Foundation (@FHF_Official) December 10, 2022
See here: https://t.co/S3C6oYqedkpic.twitter.com/8NgwZS8D6x
सायरा बानो नेहमीच दिलीप कुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 56 वर्षे सतत दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या वावरत होत्या. निधनाआधी काही वर्षे दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी त्यांची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतली. दिलीप कुमार यांची शेवटपर्यंत सायरा बानो यांनी साथ सोडली नाही.
आजारपणातही त्यांची तितकीच काळजी घेतली. त्यांचा संपूर्ण वेळ त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच घालवला. हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडी किंग अभिनेते दिलीप कुमार यांचं 7 जुलै रोजी निधन झालं. दिलीप कुमार यांच्या निधनाने मात्र सायरा बानो आज एकट्या पडल्या आहेत.
‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है’, असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही. तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत,’ असं सायरा बानो एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.