दिलीप कुमार यांना रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्ज... जेवण आणि औषधं दिली जात आहेत नळीवाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:26 PM2018-09-24T16:26:34+5:302018-09-24T16:29:03+5:30
दिलीप कुमार यांना घरी सोडण्यात आले असले तरी ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांना अद्याप जेवण आणि औषधं ही नळीवाटे दिली जात आहेत असे डिएनए या वर्तमानपत्राने त्यांच्या बातमीत म्हटले आहे.
येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी चांगलीच खालवली होती. त्यांना छातीच्या संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. पण आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना घरी सोडण्यात आले असले तरी ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांना अद्याप जेवण आणि औषधं ही नळीवाटे दिली जात आहेत असे डिएनए या वर्तमानपत्राने त्यांच्या बातमीत म्हटले आहे.
फैजल फारूखी हे दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय असून त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटवर लिहिले आहे की, तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आम्ही तुमचे आभार मानत आहोत... दिलीप कुमार यांची तब्येत चांगली असून ते सध्या घरी आहेत.
दिलीप कुमार यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे.
ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरचे अभिनय करताना दिसले. त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
दिलीप कुमार हे ९५ वर्षांचे आहेत. छातीत दुखू लागल्याने ५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची तब्येत सुधारत आहे.