Dilip Kumar: दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला तोडणार, आलिशान इमारत उभी राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:23 PM2023-08-03T20:23:33+5:302023-08-03T20:25:59+5:30
Dilip Kumar: बॉलिवूडमधील महान कलाकार दिवंगत दिलीप कुमार यांचं निवासस्थान असलेला पाली हिल येथील बंगला लवकरच तोडला जाणार असून, येथे ११ मजली आलिशान निवासी इमारत उभी राहणार आहे.
बॉलिवूडमधील महान कलाकार दिवंगत दिलीप कुमार यांचं निवासस्थान असलेला पाली हिल येथील बंगला लवकरच तोडला जाणार असून, येथे ११ मजली आलिशान निवासी इमारत उभी राहणार आहे. दिलीप कुमार यांच्यासाठी अत्यंत प्रिय असलेला हा बंगला तोडून तिथे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक संग्रहालयही उभारलं जाणार आहे. मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुमारे अर्धा एकर परिसरामध्ये दिलीप कुमार यांचा हा बंगला पसरलेला आहे. त्यामध्ये १.७५ लाख चौरस फूट एवढे बांधकामाचे क्षेत्र असून, त्यावर ११ मजली इमारत उभी राहणार आहे.
दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील हा प्लॉट अनेक वर्षांपासून कायदेशीर पेचामध्ये अडकला होता. दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी एका बिल्डरवर त्यांची संपत्ती हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला होता. दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर २०१७ मध्ये हा प्लॉट दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना मिळाला होता.
आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला आणि प्लॉटवर ११ मजली लक्झरी रेशिडेंशिल प्रोजेक्ट आणि एक संग्रहालय बनवण्यास मान्यता दिली आहे. या दोन्ही वास्तूंसाठी प्रवेशद्वार वेगवेगळी असतील. येथील रहिवासी प्रकल्पाचं मूल्य हे ९०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे. दिलीप कुमार यांच्या या बंगल्याची २०२१ मधील किंमत सुमारे ३५० कोटी रुपये होती. हा बंगला त्यांनी १९५३ मध्ये १.४ लाख रुपयांना खरेदी केला होता.