तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:59 AM2024-11-18T10:59:18+5:302024-11-18T11:00:08+5:30
काल १७ नोव्हेंबर रोजी दिलजीत दोसांझची अहमदाबाद येथे कॉन्सर्ट झाली.
पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्समुळे चर्चेत आहे. ठिकठिकाणी त्याच्या कॉन्सर्ट्सला कमालीचा प्रतिसाद मिळतोय. 'दिल लुमिनाटी' असं त्याच्या टूरचं नाव आहे ज्याचे कार्यक्रम जगभरात होत आहेत. दरम्यान नुकतंच त्याला तेलंगणा सरकारने नोटीस पाठवली होती. 'पटियाला पेग' सारखी मद्याला प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्याची ही नोटीस आहे. या नोटीसीला आता दिलजीतने काल झालेल्या कॉन्सर्टमध्ये खरमरीत उत्तर दिलं आहे.
काल १७ नोव्हेंबर रोजी दिलजीत दोसांझची अहमदाबाद येथे कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टमध्येच दिलजीतने स्टेजवरुन चाहत्यांशी संवाद साधला. सरकार त्याला पाठवत असलेल्या नोटीसीवर त्याने भाष्य केलंय. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणतो, " एक गुडन्यूज आहे. आज मला कोणतीच नोटीस आलेली नाही. याहून मोठी चांगली बातमी अजून एक आहे. आजही मी दारुवर कोणतंही गाणं गाणार नाही. का नाही गाणार सांगा? कारण गुजरात ड्राय स्टेट आहे. अच्छा, मी डझनभर भक्तीमय गाणीही गायली आहेत. मागील १० दिवसात मी दोन भक्तीपर गीत गायले. एक शिव बाबांवर आणि दुसरं गुरुनानक बाबा. पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. प्रत्येक जण टीव्हीवर बसून पटियाला पेगबद्दलच बोलत आहे. एखादा अभिनेता जर तुम्हाला सांगतो तर तुम्ही त्याला बदनाम करता आणि एक गायक दारुवर गाणी गातो त्याला तुम्ही लोकप्रिय करता असं एका न्यूज चॅनला अँकर बोलत होता. भाई, मी कोणाला वेगळा फोन करुन नाही बोलत की तू पटियाला पेग घेतला की नाही घेतला? मी गाणं गातोय. बॉलिवूडमध्ये दारुवर हजारो गाणी आहेत. माझे जास्तीत जास्त दोन चार आहेत. पण मी आता गाणार नाही."
"माझ्यासाठी हे सोपं आहे कारण मी स्वत: दारु पीत नाही. पण बॉलिवूड कलाकार दारुच्या जाहिराती करतात दिलजीत दोसांझ करत नाही. तुम्ही मला त्रास देऊ नका मी जिथे जातो चुपचाप माझी कॉन्सर्ट करतो आणि जातो. तुम्ही कशाला त्रास देता मला. एक मोहीम सुरु करुया की आपल्या देशातील सर्व राज्य ड्राय स्टेट घोषित होणार असतील तर त्याच्या पुढल्याच दिवशी दिलजीत दोसांझ आयुष्यात कधी दारुवर गाणं गाणार नाही. मी शपथ घेतो. पण असं खरंच होऊ शकतं का? कारण त्यातून खूप कमाई होते. कोरोनामध्ये सगळं बंद झालं पण दारुची दुकानं नाही. काय बोलताय तुम्ही. तरुणांना उल्लू बनवू शकत नाही. आणखी एक आव्हान देतो जिथे जिथे माझे शो आहेत तिथे तो एक दिवस ड्राय स्टेट घोषित करा मी दारुवर गाणं गाणार नाही. मी गुजरात सरकारचा चाहता झालोय. मी तर म्हणतो अमृतसरही ड्राय स्टेट घोषित करा."