या अभिनेत्रीने टेलरसोबत केले होते लग्न, 60 वर्षे केले बॉलिवूडवर राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:57 PM2019-10-11T12:57:02+5:302019-10-11T12:58:11+5:30
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात कधी मायाळू आई तर कधी खट्याळ सासू तर कधी आजीची भूमिका साकारणा-या, हिंदी व गुजराती रंगभूमी गाजवणा-या या अभिनेत्रीचा आज स्मृतीदिन...
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात कधी मायाळू आई तर कधी खट्याळ सासू तर कधी आजीची भूमिका साकारणा-या, हिंदी व गुजराती रंगभूमी गाजवणा-या अभिनेत्री दिना पाठक यांचा आज स्मृतीदिन. 11 ऑक्टोबर 2002 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिना पाठक शेवटपर्यंत चित्रपटांत काम करत होत्या. ऐकून आश्चर्य वाटेल पण इतक्या प्रदीर्घ काळ बॉलिवूडमध्ये काम करूनही दिना पाठक शेवटपर्यंत भाड्याच्या घरात राहिल्या. अर्थात अखेरच्या दिवसांत त्यांनी एक घर खरेदी केले होते.
गुजराती नाट्यसृष्टीत दिना पाठक यांचे मोठे नाव होते. त्यांचे मूळ नाव दिना गांधी होते. अगदी कमी वयात दिना पाठक यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शिक्षणासाठी दिना पाठक मुंबईत आल्या आणि विद्यार्थी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला सहभाग घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात गुजरातच्या भवाई थिएटरच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात लढा आणि स्वातंत्र्याबाबत जनजागृती पसरवण्याचे काम दिना पाठक यांनी केले.
दिना यांनी बलदेव पाठक यांच्याशी विवाह केला. बलदेव पाठक यांचे मुंबईच्या गेट वे आॅफ इंडियाजवळ टेलरींगचे दुकान होते. त्या काळात बलदेव पाठक हे राजेश खन्ना आणि दिलीप कुमार यांचे कपडे डिझाईन करायचे. राजेश खन्ना यांच्यासाठी ‘गुरू कुर्ता’ आणि असे अनेक कपडे त्यांनी डिझाईन केले होते. याचमुळे बलदेव स्वत:ला भारताचे पहिले डिझाईनर मानायचे. पण राजेश खन्नांचे यांच्या करिअरला ओहोटी लागली तशी बलदेव यांच्या दुकानालाही उतरती कळा लागली. त्यामुळे बलदेव यांना आपले दुकान बंद करावे लागले. वयाच्या 52 व्या वर्षी बलदेव यांचे निधन झाले.
दिना आणि बलदेव यांना सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक शहा अशा दोन मुली आहेत. आईप्रमाणेच सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक शहा या दोघींनीही अभिनय क्षेत्रात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले.
दिना पाठक यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 120 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. 60 वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये गुजराती रंगभूमीवरही त्या सक्रीय राहिल्या.
मौसम, उमराव जान, कोशिश, चितचोर, वो सात दिन, मिर्च मसाला, गोलमाल अशा एकापेक्षा एक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केलेले आहे. मालगुडी डेज या अत्यंत गाजलेल्या मालिकेतही त्या झळकल्या होत्या. 2003 मध्ये आलेला पिंजर हा दिना पाठक यांचा अखेरचा चित्रपट होता. 11 ऑक्टोबर 2002 रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.