अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:11 IST2025-03-06T09:11:21+5:302025-03-06T09:11:42+5:30
बॉलिवूडबरोबरच अनुराग कश्यपने स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईलाही कायमचा रामराम केला आहे. अनुराग कश्यप मुंबई सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाला आहे.

अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..."
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वीच इंडस्ट्री सोडण्याचं वक्तव्य केलं होतं. त्याबरोबरच मुंबईपासूनही दूर जाणार असल्याचं अनुराग कश्यप म्हणाला होता. अखेर बॉलिवूडला कंटाळून दिग्दर्शकाने मुंबई सोडली आहे. बॉलिवूडबरोबरच अनुराग कश्यपने स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईलाही कायमचा रामराम केला आहे. अनुराग कश्यप मुंबई सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाला आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, मुंबई सोडल्यानंतर आता अनुराग कश्यप बंगळुरू येथे राहत आहे. द हिंदूशी बोलताना तो म्हणाला, "मी मुंबई सोडली आहे. मला सिनेइंडस्ट्रीमधील लोकांपासून दूर राहायचं आहे. इंडस्ट्री आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती विषारी झाली आहे. प्रत्येक जण टारगेटच्या मागे धावत आहे. प्रत्येकाला फक्त ५०० आणि ८०० कोटींचा सिनेमा बनवायचा आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह वातावरण राहिलेलं नाही". याबरोबरच अनेक दिग्दर्शक मुंबई सोडून दुसरीकडे स्थायिक झाल्याचा खुलासाही अनुराग कश्यपने केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच केलेलं मुंबई सोडण्याचं विधान
'द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला होता की, "आता इथे सिनेमा बनवण्यात काही मजा राहिली नाही. सहा वर्षांपूर्वी बनवलेला सिनेमा जशाच्या तसा आज बनवायचा झाला तर तेव्हापेक्षा सहापट जास्त खर्च होईल. यात सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे सिनेमा बनवण्यात आता मजा राहिलेली नाही कारण आता सगळं पैशात मोजलं जात आहे. आता बाहेर जाऊन सिनेमा बनवणं माझ्यासाठी कठीण आहे. सुरुवातीपासून आपला सिनेमा कसा विकला जाईल याकडेच लक्ष दिलं जात आहे. मूळ सिनेमा बनवण्यात जी मजा आहे ती संपत चालली आहे. म्हणूनच मला आता इथून बाहेर पडायचं आहे. मी मुंबईतून बाहेर पडणार आहे. मी आता साऊथला जाणार आहे. मला तिथे जायचंय जिथे मला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. नाहीतर मी म्हाताऱ्या माणसासारखा इथेच मरेन. आपल्याच इंडस्ट्रीत जे सुरु आहे ते मला पटत नाहीए आणि मी अक्षरश: निराश झालो आहे.
अनुराग कश्यपचे सुपरहिट सिनेमे!
अनुराग कश्यपने त्याच्या कारकीर्दीत बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. गँग्स ऑफ वासेपूर, देव डी, ब्लॅक फ्रायडे यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी, राजकुमार राव या अभिनेत्यांनाही अनुराग कश्यपमुळेच ओळख मिळाली.