प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 19:30 IST2024-04-14T19:30:03+5:302024-04-14T19:30:03+5:30
प्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप केलाय (hansal mehta, air india)

प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली...
'स्कॅम 1992' या वेबसिरीजचे निर्माते आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत एक संतापजनक प्रकार घडलाय. हंसल मेहता यांनी एअर इंडिया विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. हंसल यांनी एअर इंडियावर त्यांच्या सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. हंसल यांचे कपडे खराब झाले असून त्यांनी एअर इंडियावर आरोप ठेवले आहेत. यावर एअर इंडियाने सुद्धा उत्तर दिलंय. नेमकं प्रकरण काय?
नुकतेच प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता मुंबईहून लंडनला गेले. एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यान घडलेल्या घटना त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. त्यांच्या बॅगेत ठेवलेले सर्व कपडे खराब झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांची सुटकेस उघडण्यात आली किंवा त्यात छेडछाड करण्यात आली, याशिवाय कपड्यांवर एक चिकट पिवळे केमिकल पसरल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
हंसल यांनी लावलेल्या आरोपाबद्दल एअर इंडियाने उत्तर दिलंय की, "प्रिय हंसल मेहता, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्ही दिलेला प्रतिसाद आमच्या तपासासाठी महत्त्वाचा आहे. कृपया या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. तुम्ही संयम ठेवल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद." आता हंसल यांना न्याय मिळणार का? हे पाहायचं आहे.