'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:41 IST2025-01-27T12:40:16+5:302025-01-27T12:41:01+5:30
'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar)

'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."
'छावा' (chhaava movie) सिनेमासंदर्भातील छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या नृत्याबद्दल महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "आज राजसाहेबांशी भेट झाली. कारण मला त्यांचा सल्ला हवा होता. त्यांचं वाचन खूप दांडगं आहे. महाराजांवर त्यांनी खूप वाचन केलंय. त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल करायला हवेत, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. या चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. या सूचना खूप चांगल्या आहेत. त्यासाठी राज ठाकरेंचे खूप धन्यवाद."
'छावा'मधील लेझीम दृश्याबद्दल लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "लेझीम खेळतानाचे दृश्य डीलिट करणार. त्यामागे कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. कोणाला वाटत नसेल की, आपले राजे असं नाचत असतील. हे दृश्य फिल्मचा इतका मोठा भाग नाहीये. त्यामुळे निश्चित आपण हा भाग डीलिट करु. आमची संपूर्ण टीम गेली चार वर्ष या सिनेमावर रिसर्च करत आहे. यामागे उद्देश हाच की, छत्रपती संभाजी महाराज काय होते, ते किती महान योद्धा होते हे संपूर्ण जगाला कळावं. पण अशा एक-दोन गोष्टी त्याला गालबोट लावत असतील तर त्या डीलिट करायला आम्हाला काही हरकत नाही."
लक्ष्मण उतेकर पुढे म्हणाले की, "आपला संपूर्ण चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारीत आहे. या कादंबरीचे ऑफिशिअल राईट्स घेऊन आम्ही हा सिनेमा बनवलाय. छावा कादंबरीमध्ये लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराज होळीच्या आगीतून नारळ काढायचे. याशिवाय लेझीम हा एक पारंपरिक खेळ आहे. या दृश्यात आजच्या काळातले डान्स स्टेप्स आहेत किंवा आपल्याला लाज वाटावी, असं काही महाराज करत आहेत, असं काही दृश्य नाहीये."
"लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे पिक्चर बनवताना महाराज लेझीम का खेळले नसतील, हा प्रश्न नेहमी होता. महाराज त्यावेळी २० वर्षांचे होते. महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला अन् ते जिंकून रायगडावर आले. तेव्हा एक २० वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्याच्यात गैर काय असं मला वाटतं. पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये. महाराजांपेक्षा मोठा नाहीये. त्यामुळे नक्कीच आम्ही हे डिलीट करु."